आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या लेकींच्या अनेक करामतीही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे क्रांती ही तिच्या लेकींमुळे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चांगळच चर्चेत आली आहे. (Kranti Redkar Wankhede On Instagram)
नुकत्याच सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते अजित पवार गटाबरोबर बसल्यामुळे राजकीय कल्लोळ झाला. यावर अनेकांनी आपापली मतं मांडत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची खुपच चर्चा झाली. याच संदर्भात क्रांतीने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “नमस्कार, मी क्रांती रेडकर-वानखेडे. मला अनेक असे विषय असतात जे भावतात, त्याविषयी मला थोडं बोलावसं वाटतं. असाच एक विषय म्हणजे, नुकतंच लिहिलं गेलेलं एक पत्र. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे पत्र लिहिलं. या पत्रात असं लिहिलं होतं की, सत्ता येते-जाते, पण आपला देश महत्त्वाचा. अशी एक व्यक्ती जिच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत, जी जामिनावर सुटून आज बाहेर आहे, ती व्यक्ती विधानसभेत जाऊन बसू शकते का? हा प्रश्न लोकांच्या मनाला भेडसावत होता, यामुळे लोक गोंधळले होते. देशद्रोहाचे आरोप असलेली व्यक्ती, महायुती सरकारमध्ये, ताठमानेने सत्ताधाऱ्यांबरोबर बसू शकते का? यावर खूपच गदारोळ झाला. या वादाला शांत करणारं असं हे एक पत्र होतं.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “यातील सत्ता येते जाते पण देश महत्त्वाचा हे वाक्य मला फार आवडलं. कारण, आजच्या काळात एक मुरलेला राजकारण्यासाठी त्याची खुर्ची सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. ती खुर्ची पणाला लावून, ते फक्त देशाचा विचार करतात, असे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुमच्या मनातल्या जनहिताच्या भावनेला आमचा मानाचा मुजरा.” दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मालिका व समीर-क्रांती यांच्यात बरेच वाद-विवाद झाले होते. क्रांतीने नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यातील वाद मिटलेले नाहीत. अशातच या व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.