मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता चिन्मय मांडलेकर त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. चिन्मयने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र आता एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीनंतर चिन्मय ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकला आहे. या मुलाखतीदरम्यान बोलताना चिन्मयने त्याच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्याबाबत भाष्य केलं. मात्र आता तो लेकाचं नाव जहांगीर ठेवण्यावरुन ट्रोल झाला आहे. (gautami deshpande support chinmay mandlekar)
मुलाच्या नावावरुन ट्रोल होताच चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत “भारत सोडून जायला आम्ही काही इंग्रज नाही म्हणत”, चांगलंच सुनावलं. यावेळी तिने तिच्या लेकाच्या जहांगीर या नावाचा अर्थ देखील सांगितला. जहांगीर म्हणजे जग्गजेता असं असल्याने त्यांनी नावाच्या सुंदर अर्थामुळे हे नाव ठेवलं असल्याचं सांगितलं. पत्नीच्या पोस्टनंतर स्वतः चिन्मयने देखील या मुद्द्यावर सडेतोड भाष्य करणारा एक व्हिडीओ शेअर केला.

चिन्मयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने या प्रकरणाबाबत त्याच मत स्पष्ट केलं. चिन्मय म्हणाला, ““महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं. पण, जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या ११ वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करु इच्छितो की, यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”. चिन्मयच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना आणि कलाकार मंडळींना खूप मोठा धक्का बसला.
सध्या चिन्मय मांडलेकरच गालिब हे नाटक उत्तम सुरु असून यांत अभिनेत्री गौतमी देशपांडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. गौतमीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला चिन्मय मांडलेकरचा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. “कलाकारांना अशा प्रकारची वागणूक देण्यात येते का?, असे सॉफ्ट टार्गेट बनवायचे असेल तर लोकांची लायकी नाही काही चांगलं मिळवण्याची. हे पाहून अतिशय वाईट आणि निराशजनक वाटले. हे असे व्हायला नको होते. चिन्मय दादा आमचा तुला कायमच पाठिंबा आहे”, असं म्हणत तिने हा स्टोरी पोस्ट केली. चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ हे नवंकोरं मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अष्टविनायक प्रकाशित, मल्हार व वज्रेश्वरी निर्मित या नाटकात ‘माझा होशील ना’ मालिकेतील लोकप्रिय जोडी सई व आदित्य म्हणजेच गौतमी देशपांडे व विराजस कुलकर्णी पाहायला मिळत आहेत.