मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया व रितेश देशमुख या जोडीकडे पाहिलं जातं. बऱ्याच चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं आहे. पण ‘वेड’ हा चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. ही जोडी २०१२मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यांना दोन मुलं आहेत. ज्यांची नाववं रियान व राहिल अशी आहेत. हे जोडपं त्यांच्या क्यूटनेससाठी तर प्रसिद्ध आहेच पण ते आपल्या मुलांबरोबर जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा त्यांनी मुलांवर केलेल्या संस्कारांचंही अनेकदा कौतुक केलं जातं.
जिनिलीया व रितेश ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी जोडी आहे. रितेश व जिनिलीया हे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. जिनिलीया व रितेश हे त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात. जिनिलीया व रितेशच्या दोन्ही मुलांना खेळाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे रितेश व जिनिलीया आपल्या लेकांच्या खेळाच्या प्रेमाबद्दल अनेकदा पोस्ट शेअर करत असतात.
अशातच रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याच्या लेकांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रितेशची दोन्ही मुलं द ग्रेट सुनील गावस्कर यांच्याकडून त्यांची सही घेत आहेत. टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि द लीडेंड सुनील गावस्कर यांचा आज जन्मदिवस आहे. ते ७५ वर्षांचे झालेत. याचनिमित्ताने रितेशने सुनील गावस्कर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचवेळी रितेशच्या लेकांनी सुनील गावस्कर यांच्याकडून सही घेतली.
आणखी वाचा – ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर ‘पाऊस’ वेबसीरिजची मोठी घोषणा, चित्रीकरणाला सुरुवात, कोणते कलाकार झळकणार?
“जेव्हा माझी मुलं माझ्या हीरोला भेटतात” असं म्हणत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला असून यापुढे त्याने सुनील गावस्करांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यापुढे त्याने “दिग्गजांना प्रेरणा देणाऱ्या माणसाला सुनील गावस्करजी तुम्हाला उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो” असंदेखील म्हटलं आहे. दरम्यान, रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘पिल’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.