खरंतर ‘बाप’ नावाच्या माणसासाठी कोणताही एक दिवस नसतो. तर त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यातील सर्वच दिवस असतात. मात्र आपल्या आयुष्यातील ‘बाप’ नावाच्या माणसाबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून भारतात दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. ‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पडद्यामागील कलाकार असतो. त्यामुळे आजच्या दिवशी सर्वचजण आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पाहायला मिळतात. अशीच कृतज्ञता व्यक्त केली आहे अभिनेता प्रथमेश परबने.
‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून दगडू म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेशने आजवर अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. आशातच आज त्याने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने वडिलांबद्दल एक खास पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे त्याने फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये प्रथमेशने त्याच्या वडिलांबद्दल भावना व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षांत खूप काही बदललं. वेगवेगळे चित्रपट, त्यातील पात्रे, कथा, तुम्हाला माणूस म्हणूनही घडवत असतात. चाळीमधून फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. स्विफ्टची जागा क्रेटाने घेतली. जीवनशैली बदलत असली तरी काही गोष्टींची पाळंमुळं आपल्यात कायम रुजू द्यावी हे मात्र मी माझ्या बाबांकडून शिकत आहे”.
आणखी वाचा –
यापुढे त्याने “गेली ३० ते ३५ वर्षे ते सायकल चालवतात. अजूनही ऑफिसला ते सायकलने जातात. काम करत रहावं, माणूस आपोआप तंदुरुस्त रहातो असं त्यांचं म्हणणं. बाबा, तुम्ही आयुष्यभर असेच तंदुरुस्त आणि आनंदी रहा याच ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा” असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशचे बाबा सायकलवर असून प्रथमेश त्यांच्याशी खास संवाद साधतानाचे पहायला मिळत आहे.
आणखी वाचा –
त्याचबरोबर लेकाच्या कामगिरीमुळे त्याच्या वडिलांनादेखील त्याच्यावर गर्व वाटत असून ते या व्हिडीओमध्ये भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रथमेशने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी अभिनेता व त्याच्या वडिलांना ‘फादर्स डे’निमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.