अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर त्यांच्या मुलाच्या नावावरुन ट्रोल झाला असल्याचं पाहायला मिळालं. या ट्रोलिंगला उत्तर देत चिन्मयने सडेतोड भाष्यही केलं. चिन्मयने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर चिन्मय त्याच्या मुलाच्या नावावरुन ट्रोलींगच्या कचाट्यात अडकला. सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्याला बरंच ट्रोल केलं. यादरम्यान काही कलाकार मंडळींनी या ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त करत सडेतोड उत्तरही दिलेलं पाहायला मिळालं. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान या ट्रोलिंगवर त्याचं मत मांडलं आहे. (Astad Kale On Trolling)
‘बिग बॉस मराठी’मुळे अभिनेता आस्ताद काळे घराघरांत पोहोचला. अनेक नाटक, मालिका यांमधून आस्तादने सिनेसृष्टीत नाव कमावलं. नुकतीच आस्तादने ‘आरपार’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्या पर्शियन नावाच्या ट्रोलिंगबद्दल मत व्यक्त केलं. यावेळी बोलताना चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगवरही त्याने त्याचं असं मत मांडलं. आस्ताद म्हणाला, “नशिबाने माझ्या या नावाचा कोणी सुलतान वगैरे होऊन गेला नाही. त्यामुळे माझे आई-वडील वाचले. मला असं वाटतं, खरंतर हा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण गजानन नावाचा माणूस गुन्हेगार होऊ शकत नाही का?, तर तसं नाही. गजानन नावाचेदेखील गुन्हेगार आहेत आणि ते सगळ्यांना माहिती आहे. मनोज, राजन नावाचे गुन्हेगार होऊन गेले आहेत. नावात काहीच नसतं, तुम्ही घरी संस्कार काय करत आहात यावर सगळं अवलंबून असतं”.
पुढे तो असंही म्हणाला की, “पण प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे न्यायचीच असेल तर जाऊदे, ती एक मनोवृत्ती आहे. मी त्याला विरोधही करायला जाणार नाही आणि त्याला पाठिंबा तर मुळीच देणार नाही. चिन्मय व नेहा हा मुद्दा हाताळण्यासाठी खूप परिपक्व आहेत. मला त्याचा सामना करावा लागला नाही, कारण जेव्हा माझं नाव ठेवलं गेलं, तेव्हा धार्मिक भावना एवढ्या बोथट नव्हत्या”.
“खरंतर हे नाव पारसी किंवा पर्शियन आहे हेच लोकांना माहीत नसेल आणि या नावाचा सुलतान, जुलमी किंवा आक्रमणकर्ता असा कोणीच होऊन नाही गेला आहे. आतापर्यंत तरी असं काही इतिहासात बाहेर आलेलं नाही पुढे आलं तर मग माझंही ट्रोलिंग होईल, मग बघू काय करायचंय ते”, असंही आस्ताद म्हणाला.