वाढदिवस म्हटला की, जंगी सेलिब्रेशन आलंच. सजावट, औक्षण, गोडाधोडाचं जेवण किंवा मग मोठ-मोठ्या पार्ट्याही आल्या. पण अनेकजण हे जंगी सेलिब्रेशन न करता आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करतात. मोठ्या पार्ट्यांपेक्षा गरजूंना मदत करत ते आपली सामाजिक बांधिलकी जपतात. असंच काहीसं केलं आहे एका मराठी अभिनेत्याने आणि हा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. आज ३१ जानेवारी रोजी अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. अंकुशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच त्याने केलेल्या कृतीमुळे तो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून अंकुशने गरजूंना अन्नदान केलं आहे.
अंकुशच्या अन्नदानाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अंकुश गरजूंना अन्नदान करत आहे आणि त्याला अभिनेता स्वप्नील जोशीनेही साथ दिली आहे. अंकुश चौधरी ज्या भागात राहतो, त्याठिकाणी अनेक मोठमोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांबाहेर गरजूंसाठी अन्नदानाचे उपक्रम राबवले जातात आणि उपक्रमात अंकुशने सहभाग घेत त्याचा वाढदिवस स्पेशल केला आहे आणि या विशेष उपक्रमात अंकुशला अभिनेता स्वप्नील जोशीने व हिंदुस्तानी भाऊ यांनी साथ दिली आहे.
अभिनेता अंकुश चौधरी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या स्टायलिश फोटोसह कामाबद्दलची माहितीदेखील शेअर करत असतो. अशातच त्याच्या वाढदिवसानिमित्तचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून अभिनेत्याच्या अनोख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. अंकुशने तो राहत असलेल्या परिसरात गरिबांना अन्नदान करत त्याचा यंदाचा वाढदिवस साजरा केला आहे आणि त्याची ही कृती कौतुकास पात्र ठरत आहे.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला रॅपर रफ्तार, साऊथ इंडियन पद्धतीने केला विवाह, फोटो व व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अंकुश चौधरी त्याच्या निवडक कामांसाठी ओळखला जातो. गेल्याकाही वर्षात त्याचे मोजके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘दगडी चाळ २’ नंतर अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. अशातच आजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अंकुशच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर समोर आलं हे. पी.एस.आय.अर्जुन असं या चित्रपटाचं नाव आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.