सध्या मल्याळम मनोरंजन क्षेत्रातून खळबळजनक खुलासे होताना दिसून येत आहेत. एकानंतर लगेचच दुसरी प्रकरणं समोर येताना दिसत आहेत अत्याचार, शारीरिक शोषण, लैंगिक शोषण याबद्दल आता मनोरंजन क्षेत्रातील महिला आता व्यक्त होत आहेत. दिग्दर्शक व क्षेत्रातील इतर व्यक्तींवर महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. याममध्ये आता अभिनेता व भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे आमदार मुकेशचादेखील समावेश आहे. मुकेशवर महिलेने लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले असून त्यावर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत आहे. (sarita on domestic violence)
मुकेशने राजीनाम द्यावा अशी मागणी आता पक्षाकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षदेखील या सगळ्यांचा विरोध करताना दिसत आहे. यादरम्यान आता मुकेशच्या पहिल्या पत्नीने केलेलं विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुकेश यांची पहिली पत्नी सरिताने त्यांच्या वागणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले होते. मीडियामध्ये १० वर्षांपूर्वी केलेले आरोप चर्चेत आले आहेत. त्यावेळी मुकेशने नृत्यांगणा मेथील देविकाबरोबर दुसरे लग्न केले होते. त्यावेळी सरिता यांनी अनेक खुलासे केले होते. ‘मनोरमा ऑनलाइन’बरोबर सरिता यांनी सांगितले की, “मी जे काही सहन केले आहे ते सांगतानादेखील मला लाज वाटत आहे. माझ्याबरोबर इतकं काही होऊ शकतं यावर माझा विश्वासच नाही. मी चित्रपटांमध्ये काम केले आहे. माझ्याबरोबर इतकं काही होईल असा विचारदेखील मी केला नव्हता”.
पुढे त्यांनी सांगितले की, “मुकेश यांचे बाहेर असणारे प्रेमसंबंध हे आमचे वेगळे होण्याचे मुख्य कारण आहे. तसेच मुकेशने घरगुती हिंसाचारदेखील केले. पण याबद्दल मी बोलायला घाबरत होते. जेव्हा माध्यमांना समजलं की माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं होत आहे. तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आमच्यामध्ये सगळं काही ठीक आहे असं दाखवण्यासाठी आम्ही ओणमच्या वेळचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले होते. पण जेव्हा भांडणं सुरु होती तेव्हा मुकेश यांचे बाहेर अफेअर सुरु होते”.
पुढे सरिता म्हणाल्या की, “माझ्या वडिलांच्या निधनानंतर मुकेश यांच्याकडे मी वडिलांप्रमाणे बघायला लागले होते. मात्र त्यांनी मला घरातील नोकरांसामोर मारहाण केली होती. त्यानंतर मी घरी जाणं बंद केलं. जेव्हा मी गरोदर होते तेव्हा त्यांनी माझ्या पोटात लाथ मारली आणि मी पडले होते. मी खूप रडू लागले. पण मला न सांभाळता म्हणाले की तू चांगली अभिनेत्री आहेस. जा जाऊन रडत बस. तसेच एकदा मी नऊ महिन्यांची गरोदर असताना आम्ही जेवायला बाहेर गेलो होतो. मी जेव्हा गाडीमध्ये बसायला गेले तेव्हा ते गाडी मागे पुढे करत होते. मी गाडीच्या मागे धावता धावतादेखील खाली पडले आणि मी रडायला लागेल. तसेच एकदा ते खूप दारू पिऊन घरी आले पण मी इतका उशीर का झाला? असे विचारले असता त्यांनी माझे केस खेचले आणि जमिनीवर पाडून खूप मारलं होतं”. सरिता व मुकेश यांचा २०११ साली घटस्फोट झाला. तसेच दुसरी पत्नी देविकाबरोबरदेखील २०२१ साली घटस्फोट घेतला होता.