Kalabhavan Navas found dead in hotel : मल्याळम सिनेसृष्टीत एक हादरवणारी घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. मल्याळम लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री कलाकार कलाभवन नवास याचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. कोच्चिच्या चोट्टानिकारा हॉटेलमध्ये तो मृत अवस्थेत सापडला. ५२ वर्षीय अभिनेता कलाभवन या हॉटेलमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी थांबला होता. जेव्हा हॉटेलच्या कर्मचार्यांनी अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
‘पीटीआय’ यांनी पोलिसांना उद्धृत केले की कलाभवनला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कलाभवन नवासला हृदयविकाराचा झटका आल्याचा पोलिसांचा संशय आहे. असे सांगितले जात आहे की शूटिंगच्या संदर्भात मल्याळम चित्रपट ‘प्रकम्बनम’ साठी कलाभवन हॉटेलमध्ये राहत होता. १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी हॉटेलमधून चेकआऊट करणार होता, परंतु बराच वेळ जेव्हा तो रिसेप्शनमध्ये पोहोचला नाही, तेव्हा हॉटेल कर्मचारी तो राहत असलेल्या खोलीजवळ गेले आणि अभिनेता त्याच्या खोलीत बेशुद्ध पडलेला दिसला.
आणखी वाचा – तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे किती फायद्याचे?, शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, जाणून घ्या…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या खोलीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. कलाभवन नवासचे पोस्ट -मॉर्टम शनिवारी, २ ऑगस्ट रोजी कलामस्सरीच्या शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये केले जाईल. तरच मृत्यूचे खरे कारण माहित होईल. पोस्ट -मॉर्टम नंतर ते शव त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले जाईल.
कलाभवन नवासबद्दल बोलायचे झाले तर तो मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक सुप्रसिद्ध चेहरा होता. १९९५ मध्ये त्याने ‘चैथनाम’ या चित्रपटापासून अभिनय कारकीर्द सुरु केली. यानंतर तो ‘मीनाक्षी कल्याणम’, जूनियर मैंड्रेक, ‘चंदामामा’, ‘अम्मा अम्मायम्मा’, ‘माई डियर कराडी’ आणि ‘मट्टुपेट्टी मचान’सारख्या अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये दिसला. त्याने टीव्ही जगातही काम केले आणि बर्याच मालिकेतही तो दिसला. कलाभवन अभिनेता आणि गायक होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलयचे झाले तर, आता त्याच्या कुटुंबात एक पत्नी आणि तीन मुले आहेत. २००२ मध्ये त्याने लग्न केले.





