अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून कुशल घराघरांत पोहोचला. मात्र या कार्यक्रमाने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला असून त्यानंतर आता तो ‘मॅडनेस मचाऐंगे’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आजवर कुशलने त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र हा विनोदी दिसणारा कुशल खऱ्या आयुष्यात खूपच हळवा आहे. ‘मॅडनेस मचाऐंगे’च्या मंचावर कुशलने नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Kushal Badrike Emotional)
‘मॅडनेस मचाऐंगे’च्या मंचावर कुशलला पहिल्या चित्रपटाबाबत विचारण्यात आले. यावेळी बोलताना कुशल म्हणाला, “माझा पहिला चित्रपट जत्रा हा होता. २००५ साली या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. मानधनाबाबत बोलायला मी ऑफिसला गेलो. चित्रपटासाठी एका दिवसाचे पैसे दिले जायचे. आम्ही देखील नवीन होतो त्यामुळे किती पैसे घ्यायचे हे कळत नव्हतं. मी ऑफिसला गेलो. तेव्हा ते म्हणाले, तीन हजार रुपये मिळतील. म्हणजे २००५मध्ये ३० दिवसांचे तीन हजार म्हणजे एकूण ९० हजार मिळणार म्हणून मी खुश झालो”.
पुढे तो म्हणाला, “त्यानंतर त्यांनी विचारलं की, तू सगळं नीट वाचलं आहेस ना. तीस दिवसांचं तीन हजार तुझं पॅकेज आहे. हे ऐकून मला शॉक बसला. हे खूपच कमी होते. डबिंग वगैरे पडून तीन हजार मला मिळणार होते हे मी माझ्या मित्राला बोललो. आणि त्याला विचारलं काय करू?, त्यावर तो म्हणाला की, चित्रपटात यायला तुला पैसे मिळत आहेत. तुझी ही सुरुवात आहे. आणि ही खूप चांगली संधी आहे. इतका मोठा रोल तुला मिळत आहे. चित्रपटात दिग्गज मंडळी आहेत त्यामुळे मी होकार दिला. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं”.
पुढे कुशल म्हणाला, “एक श्येड्युल झालं आणि माझे बाबा आम्हाला सोडून गेले. आणि लगेच दुसरं श्येड्युल लागणार होतं. आमच्यामध्ये निधनानंतरच्या कार्यात केस कापण्याची प्रथा आहे. पण मी ते करु शकलो नाही. कारण चित्रपटाच्या कंटिन्यूटीसाठी मी ते करु शकलो नाही. मला केस ठेवावे लागले. चित्रपट प्रदर्शित झाला. मी चित्रपट पाहत होतो. आणि माझी आई माझ्या मागे बसून चित्रपट पाहत होती. चित्रपटाच्या मध्यांतराला मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझी आई माझ्या वडिलांचा फोटो घेऊन चित्रपट पाहत होती. आज त्या चित्रपटातील सगळे कलाकार मराठीतील सुपरस्टार आहेत. या चित्रपटाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली”, असं म्हणत कुशलला अश्रू अनावर झाले.