‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. असं असलं तरी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या कार्यक्रमातील कलाकार मंडळीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. या कार्यक्रमामुळेच कार्यक्रमातील कलाकारांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे चर्चेत असलेला कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. आजवर कुशलने त्यांच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. (Kushal Badrike Post)
सोशल मीडियावरही कुशल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कांत राहत असतो. सध्या कुशल हिंदी टेलिव्हिजन विश्वातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मॅडनेस मचाऐंगे या लोकप्रिय कार्यक्रमात सध्या कुशल प्रेक्षकांचं खळखळवून मनोरंजन करत आहे. मात्र लवकरच हा कार्यक्रमही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत कुशलने केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या अभिनयाबरोबरच लिखाणानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. विविध विषयांवर भाष्य करत कुशल नेहमीच काही ना काही त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. चाहतेमंडळीही कुशलच्या या लिखाणाचे कौतुक करताना दिसतात. अशातच कुशलने त्याच्या हिंदी विश्वातील प्रवासाबाबत भाष्य केलं आहे. खास पोस्ट शेअर करत तो असं म्हणाला की, “हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठी संधी, असं काही मला वाटत नाही. पण माझा अमोल पणशीकर नावाचा मित्र मला कायम म्हणतो, स्वतःचं कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही. म्हटलं एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे”.
पुढे त्याने असं म्हटलं की, “मला खरच मजा आली. खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं. आज व उद्या या हिंदी कार्यक्रमाचे शेवटचे भाग टेलिकास्ट होत आहेत. ‘मॅडनेस मजायेंगे’ हा कार्यक्रम सोनी हिंदी या वाहिनीवर नक्की बघा. आणि एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्ख आभाळ रंगवायची गरज नाही, माणसाला स्वतः पुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की पुरेसं होतं. (सुकून)”. कुशलच्या या पोस्टला प्रेक्षकांनीही पसंती दर्शिविली.