Like Aani Subscribe : काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा एक सेल्फी होता. ज्यामध्ये सेल्फी आणि प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आह, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या १८ ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने लेखक व दिग्दर्शक अभिषेक मेरुकर यांनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. या संवादात त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. (Like Aani Subscribe Writer & Director Abhishek Merukar)
१. या चित्रपटाची कथा आणि त्याची सुरुवात नक्की कधी आणि कशी सुरु झाली? यामागची कथा नेमकी काय आहे?
“काही वर्षांपूर्वी ट्विटरवर एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला एक पाकीट मिळालं. त्यातले काही डॉक्युमेंट्स मिळाले ते त्याने ट्विटरद्वारे शेअर केले. यावर त्याला काही प्रतिसाद आला. यावरुन त्या व्यक्तीची माहिती मिळाली आणि असं करत करत ज्या व्यक्तीचे ते पाकीट होते ते त्याला मिळाले. ज्या व्यक्तीचे ते पाकीट होते ती व्यक्ती भारतीय होती आणि ज्याला ते मिळालं होतं ती व्यक्ती पाकिस्तानी होती. पण माझ्या चित्रपटात भारत-पाकिस्तान असं काही नाहीये. तर सांगायचं झालं तर या घटनेवरुन मला हे सुचलं की जर अशी व्यक्ती ही स्कॅमर वगैरे करणारी असती तर… यातून मला ही गोष्ट मला सुचली की, असं सगळं नीट न होता व्लॉगिंग वगैरे करणाऱ्या व्यक्तीबरोबर हे झालं तर काय नाट्य घडेल?. मग लेखक म्हणून मला कथा आणि पात्र सुचत गेले आणि त्यावर मी अधिक काम सुरु केलं”.
२. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर हा एक मर्डर मिस्ट्रीमध्ये खिळवून ठेवणारा चित्रपट वाटतो. अशाप्रकारचा विषय चित्रपटासाठी निवडण्याचं कारण काय?
“प्रेक्षक म्हणून मी मराठी, हिंदी, दाक्षिणात्य असे अनेक चित्रपट बघत असताना मला कायम वाटायचं की, मराठी चित्रपट केवळ सामाजिक प्रश्न, बायोपिक, कॉमेडी किंवा स्त्रीप्रधान चित्रपट अशा काही प्रकारांमध्येच बनत आहे. प्रेक्षक जाणकार असताना आणि कलाकार इतके चांगले असताना चित्रपट निर्मात्यांकडून चांगले चित्रपट बनत नसल्याचे मला प्रेक्षक म्हणून वाटायचं. तर आपली वाट आपणच निवडायची आणि प्रेक्षक म्हणून पदरी काही काळ निराशा आल्यानंतर वेगळ्या आशयाची कथा लिहिली. मग लोकांपर्यंत ती कथा पोहोचावी म्हणून मी वेगळा आशयाची गोष्ट लिहिली आणि ती नितीन वैद्य या माझ्या सह-निर्मात्यांना ऐकवली. मग एकेक मांडणी करत चित्रपट घडवून आणला. मराठीमधला हा ओरीजिनल आणि युनिक चित्रपट आहे”.
३. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटामध्ये अमेय वाघ, अमृता खानविकर, जूई भागवत, शुंभकर तावडे अशी मराठीतील टॉपची स्टारकास्ट आहे. तर ही कलाकारांची निवड तुम्ही कशी केली?
“चित्रपटासाठी कलाकार निवडताना जूईची निवड ही ऑडिशनमधून झाली आहे. त्यावेळेस तिची ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका हिट झाली होती. याबद्दल मला माहीत नव्हतं. विशिष्ट वयोगट आणि आजच्या काळातली तरुण दिसणारी अशी मुलगी मला हवी होती. त्यानुसार जूई समोर येताच ती या भूमिकेसाठी अगदी योग्य असल्याचे मला जाणवले आणि जूईबद्दलची माझी खात्री झाली. अमेय वाघ करत असलेले पात्र हे त्यानेच करावे यावर मी ठाम होतो. सगळ्यात आधी मी माझी कथा त्यालाच ऐकवली होती. कथा ऐकल्यानंतर त्यालाही आवडलं आणि त्याने चित्रपट करण्याबद्दल होकार कळवला. अमृताबद्दल बोलायचे झाले तर ती एक उत्तम डान्सर आहे हे सगळेच जाणतात. पण एक अभिनेत्री म्हणून तिच्या अभिनयाचा चित्रपट निर्मात्यांकडून कधीच योग्य उपयोग केला गेला नसल्याचे मला एक प्रेक्षक म्हणून कायम वाटायचं. त्यामुळे या चित्रपटात मला जे निकष हवे होते त्या निकषांनुसार भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली”.
४. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचं मुख्य आकर्षण म्हणजे गौतमी पाटीलचं आयटम सॉंग . तर गौतमीची निवड आणि गौतमीला या चित्रपटात गाण्यासाठी घ्यावं, हे कधी ठरलं आणि तिच्याबरोबरचा काही अनुभव आहे का?
“गौतमी पाटीलबद्दल मला आधी काही कल्पना नव्हती. मी भारतात राहत नसल्याने मला तिच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. चित्रपटात एक आयटम सॉन्ग करायचे ठरले तेव्हा आम्ही अनेक नावांचा शोध घेत होतो. तेव्हा मला माझ्या टीममधील काही लोकांनी एकमताने गौतमीचे नाव सुचवले. मग मी तिच्या काही मुलाखती आणि व्हिडीओ पाहिले. चित्रपटात अशी स्थिती येते जिथे तिचा डान्स आहे आणि ती या चित्रपटात फक्त डान्सपूरतीच आहे. या डान्ससाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. अगदी तीन-चार तासांत तिने सराव करुन हे गाणं पार पाडलं”.
५. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक म्हणून जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत नेमकी कशी झाली?
“लेखन व दिग्दर्शक म्हणून तारेवरची कसरत न होता दिग्दर्शन आणि निर्मिती म्हणून माझी खरी तारेवरची करत आहे असं मला वाटतं. या चित्रपटाच्या लेखनाची सुरुवात मी २०२१ मध्ये केली होती. त्यामुळे लिखाणाचा तो प्रवास संपला आणि दिग्दर्शक म्हणून मी त्यात समरस झालो. मग मला निर्मितीतही सहभाग घ्यावा लागला. मग स्वत:ची निर्मिती संस्था निर्माण करुन या चित्रपटाच्या निर्मिती प्रकियेत ही सहभाग घेतला. त्यामुळे लेखक किंवा दिग्दर्शन ही तारेवरची कसरत नसून दिग्दर्शन व निर्मिती ही खरी तारेवरची कसरत आहे असं मला वाटतं. यात मला सहनिर्माते नितीन वैद्य यांची मदत आणि सहकार्य लाभलं.
६. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ सारख्या वेगळ्या प्रकारचा विषय मराठीमध्ये मांडताना तुमच्या डोक्यात दिग्दर्शक-लेखक म्हणून नेमकं काय सुरु होतं?, त्याबद्दल काय सांगाल?
“प्रेक्षक म्हणून मलाच काहीतरी नवीन बघायची इच्छा होती, जे खूप काही काळ मला बघता नाही आलं. त्यामुळे या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाचा निर्णय मीच घेतला. कारण दिग्दर्शन करण्यासाठी मी कुणा दुसऱ्याकडे गेलो असतो आणि माझ्या पदरी निराशाच पडली असती तर… प्रेक्षक म्हणून मला काहीतरी नवीन हवं असल्याच्या इच्छेमुळे जर नवीन काही मिळालं नसतं तर मी पुन्हा निराशच झालो असतो. म्हणून मग मी या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये उतरलो.
दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि अभिषेक मेरुकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचे निर्माते नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर आहेत. या चित्रपटात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.