Kranti Redkar Fitness : अभिनेत्री या त्यांच्या अभिनयामुळे जितक्या चर्चेत असतात तितक्याच त्या त्यांच्या फिटनेसमुळेही असतात. अभिनेत्रींच्या फिटनेसबाबत नेहमीच त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायला आवडते. बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या फिटनेसमुळे बरेचदा ट्रोलही होतात. अशाच सिनेविश्वातील एका अभिनेत्रीने प्रेग्नन्सीदरम्यान वाढलेल्या वजनाबाबत भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती रेडकरला जुळ्या मुली आहेत. गरोदरपणातील एक अनुभव अभिनेत्रीने शेअर केला आहे. क्रांती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
क्रांती रेडकरने नुकतीच सोनाली खरेच्या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या डाएटबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, “मी सगळं खाते. मी मालवणी आहे. मी माशाच्या कढीबरोबर भात खातेच.पण, मी सगळं थोडं थोडं खाते. मी समोसे, जिलेबी सगळं खाते. मात्र, मी हे सगळं कमी प्रमाणात खाते. मी सूर्यास्तानंतर खात नाही. सूर्योदय झाल्यानंतर मी बिनासाखरेची कॉफी पिते. ११ नंतर मी जेवण करते, त्यानंतर २ वाजता मी जेवते व साडे पाचला मी काहीतरी खाते”.
तसेच व्यायामाबाबत क्रांती म्हणाली की, “मी दररोज योगासने करते. गरोदरपणात मला बेडरेस्ट सांगितली होती. मी रोज आईच्या हातचं चविष्ट जेवण करत होते, त्यावेळी माझं वजन ९२ किलो झालं होतं. त्याआधी माझं वजन कायम ५६ किलो होतं. मला कायमच तंदुरुस्त राहायला आवडतं. मुलींच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी मी चालायला सुरुवात केली. सहा महिन्यांनंतर मी योगासने करायला सुरुवात केली. असं करत मी थोडं थोडं वजन कमी केलं. पुढे अभिनेत्री असेही म्हणाली की, लॉकडाऊनमध्ये मी खूप व्यायाम केला, त्यावेळी मी एकदम फिट झाले होते”.
मुलांच्या आरोग्यासाठी आहाराबाबत काय काळजी घेते? असा प्रश्न क्रांतीला विचारताच ती म्हणाली, “माझ्या मुलींना पिझ्झा, बर्गरआवडत नाही. जरी त्यांना पिझ्झा, बर्गर खावा वाटला तरी मी त्यांना घरी बनवून घेते. माझी कुक अप्रतिम बर्गर बनवते. त्यांच्या जेवणात आमटी, भात, भाजी, चिकन असे पदार्थ असतात. माझ्या मुलींना भाज्या प्रचंड आवडतात. त्यांनी भाज्या खाण्यासाठी कधीच नखरे केले नाहीत. त्यांना सॅलेड खायला आवडतं”.





