Ankita walawalkar sad post for Late Prathamesh kadam : सोशल मीडियाच्या दुनियेत रीलस्टारचा दबदबा अधिक असलेला पाहायला मिळतोय. हे रीलस्टार नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करतात. बरेचदा ही मंडळी कंटेंटसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही शेअर करतात. अशातच एका मराठमोळ्या रीलस्टारबाबत दुःखद बातमी समोर आली. रीलस्टार प्रथमेश कदम याचे निधन झाले असल्याचे समोर आले आणि अनेकांना खूप मोठा धक्का बसला. आपल्या आईबरोबर मजेशीर व्हिडीओ बनवून तो घराघरांत पोहोचला. त्याच्या निधनानं मराठी सोशल मीडिया विश्वाला धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तो एका गंभीर आजाराशी झुंज देत होता. प्रथमेशच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्याचे लाखो चाहते आणि मित्रपरिवारानं सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने देखील इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर करत प्रथमेशला श्रद्धांजली वाहिली. आणि तो असताना त्यांच्या घरी जाता आलं नसल्याची खंतही व्यक्त केली.

अंकिताने स्टोरी पोस्ट करत लिहिलं, “प्रथमेश आज तुझ्या अंत्यदर्शनाला तुझ्या घरी आले. तू कित्येक वेळा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण कधीच येणं जमलं नाही. आज तुझ्या आईला हतबल पाहून काय घडलंय, हे क्षणभर कळलंच नाही. ज्या घरात कधी येता आलं नाही, त्या घरात आज तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं. काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत, काही भेटी राहून गेल्या याची खंत राहील. जिथं असशील तिथे असंच हसत रहा”.
आणखी वाचा – ‘मुरांबा’ फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पारंपरिक पद्धतीनं पार पडला विवाहसोहळा, अभिनेत्याची पत्नी आहे…
प्रथमेशचा जवळचा मित्र आणि सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निधनाची बातमी दिली. त्यानं लिहिले, “तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे! खूप आठवण येईल तुझी… मिस यू भाई.” तन्मयच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली गेली.





