Kokan Hearted Girl Video : “कोकणची माणसं साधी भोळी” ही टॅगलाईन प्रत्येक कोकणवासीयांसाठीच बनलेली आहे. पण सध्या कुठेतरी हे वाक्य पुसलं जातंय का असं वाटत असताना एक सुंदर अशा व्हिडीओने आपसूक हे वाक्य गडद केलं. कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नेहमीच तिच्या सोशल मीडियावर मालवणी, कोकणी भाषेतील आणि कोकणातील व्हिडीओ शेअर करत साऱ्यांच लक्ष वेधून घेत असते. अंकिताचे कोकणी भाषेतील व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडतात. काही महिन्यांपूर्वीच अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर आता ही जोडी कोकणात अंकिताच्या गावी देवांच्या दर्शनाला गेली आहेत. वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात ही जोडी गेलेली असताना मंदिराबाहेरील फुलांच्या दुकानात त्यांना कोकणातील सध्या भोळ्या माणसांची प्रचिती आली.
मंदिराबाहेर असणाऱ्या फुलांच्या दुकानातील आजोबांबरोबरचे संभाषण तिने या व्हिडीओमध्ये शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता असं म्हणत आहे की, “आज आम्ही देवदर्शनला गेलो होतो आणि मी या आजोबांना म्हटलं की, मी सगळी फुलं तुमच्याकडून पैसे देऊन विकत घेते. तर ते मला म्हणाले, तुमच्यासारखे असे बरेचजण देवदर्शनाला येतील, तर त्यांना पण फुलं पुरली पाहिजेत ना?. तर ही आहेत कोकणातली साधीभोळी माणसं… म्हणजे तुम्ही म्हणता ना की, कोकणात साधीभोळी माणसं नाही राहिली आता. आहेत हो! बघा जरा”.
आणखी वाचा – वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”
अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, पैसे मिळत असूनही ते आजोबा अंकिताला सर्व फुलं देण्यास नकार देतात, कारण इतर भाविकांसाठीही त्यांना ही फुलं शिल्लक राहिली पाहिजेत असं वाटत आहे. अंकिताने फुलांचे पैसे किती झाले विचारल्यावरही ते म्हणतात की, “तुझ्या मनाला वाटतील तेवढे पैसे दे”. अंकिता पुढे म्हणाली की, “काकांना ऐकायला जरा कमी येतं, पण त्यांनी आपल्याला खूप छान गोष्ट ऐकवली”.
“जास्वंदाची फुलं… ती तशीपण संध्याकाळी कोणी घेतली नाहीत, तर कोमेजुन जातील. पण आजोबांनी पैशासाठी ती सगळी मला दिली नाहीत. तर त्यांनी हा विचार केला की माझ्यासारखं कोणी आले तर त्याना फुलं मिळावी. आपण या जगात सगळ्या गोष्टी पैशात मोजतो त्यात हा मिळालेला मोलाचा सल्ला, पैसा लागतोच पण कधीतरी भक्ती आणि व्यक्ती यांचापण विचार व्हायला हवा. कोकणात साधी माणसा आसत ओ, बघलात तर देव पण गमता”, असं सुंदर आणि लक्षवेधी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.