‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ला सुरुवात झाली असून तब्बल १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरी ते रॅपर नेझी आणि यूट्यूब, सोशल मीडियाच्या जगातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. या चेहऱ्यांमध्ये दिल्लीची ‘वडा पाव गर्ल’ चंद्रिका दीक्षितचेही नाव आहे. ‘बिग बॉस’ या शोमध्ये येताच तिने खुलासा केला की, ती दररोज ४० हजार रुपये कमावते. दरम्यान तिची मासिक कमाई १२ लाख रुपये आहे. वडापाव गर्लच्या या वक्तव्याची खूप चर्चा होत असून तिच्या कमाईचा आकडा जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Know about vadapav girl income)
चंद्रिका दीक्षितने पती व मुलाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी सोडली आणि वडापाव विकण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावण्याचे ठरवले कारण तिला स्वयंपाकाची कला अवगत आहे. जेव्हा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा लोकांच्या रांगा लागल्या. मात्र, तिच्या वडापावशी संबंधित वादांमुळे ती चर्चेत राहिली आणि तिच्यावर अनेक प्रकारचे आरोपही झाले. आता ती ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सहभागी झाली आहे. आणि तिने येताच तिच्या कमाईबद्दल केलेल्या विधानाने सह-स्पर्धकांनाही धक्का बसला.
‘बिग बॉस’च्या घराच्या बागेत वडा पाव गर्ल बसली होती. त्यावेळी सह-स्पर्धकही तिथे होते. यादरम्यान तिने दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकून दररोज ४० हजार रुपये कमावल्याचे उघड केले. चंद्रिकाने द्वेष करणाऱ्यांना उत्तर देत करत म्हटले की, “मी दररोज ४० हजार रुपये कमावते हे काहींना आवडत नाही. अरे मित्रा, मी खूप मेहनत करत आहे. तुम्ही पण करा. नेटफ्लिक्स वापरु नका, फोनवर राहू नका, बाहेर पडा, वडिलांचे पैसे सोडा”, असा सल्ला तिने दिला. चंद्रिकाच्या कमाईबद्दल ऐकून शिवानी कुमारीला धक्का बसला.
अनिल कपूर हा सीझन होस्ट करत आहे. चंद्रिका दीक्षित व्यतिरिक्त, कलाकारांमध्ये रणवीर शौरी, शिवानी कुमारी, सना सुलतान, सना मकबूल, विशाल पांडे, लव कटारिया, दीपक चौरसिया, सई केतन राव, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक, नीरज गोयत, रॅपर नाईज यांचा समावेश आहे.