Ankita Walavalkar And Kunal Bhagat Lovestory : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. अंकिताने तिच्या खेळाने आणि बोलण्याने ‘बिग बॉस’च्या घरात हवा केली. कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तिच्या वैयक्तिक कारणामुळेही बरेचदा चर्चेत राहिली. अंकिताचा होणारा जोडीदार कोण आहे याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असताना अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह रिलेशनशिपमध्ये आहे. आणि लवकरच अंकिता व कुणाल लग्नबंधनात अडकणार आहेत.
अंकिता व कुणाल यांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. लग्नाच्या शॉपिंगचे अनेक व्हिडीओ ते त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत आहेत. अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा संगीत दिग्दर्शक आहे. मालिकाविश्वातील अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांची जबाबदारी कुणालने उत्तमरीत्या पेलवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या लक्ष्मी निवास या मालिकेच्या संगीताची जबाबदारीही कुणालने उत्तमरीत्या पेलवली आहे. तर अंकिताने या नव्या मालिकेसाठी गीत लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या लक्ष्मी निवास मालिकेचा महासंगम सुरु आहे. यादरम्यान अंकिता व कुणाल यांनी मालिकेच्या सेटवर भेट दिली. यावेळी मालिकेतील लक्ष्मी म्हणजेच हर्षदा खानविलकर हिने अंकिता व कुणालच स्वागत करत भरभरुन कौतुक केलं. यावेळी हर्षदा यांच्याशी बोलता बोलता अंकिता व कुणाल यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली. ‘झी मराठी’ वाहिनीमुळेच अंकिता व कुणाल यांचे सूर जुळले असल्याचं यावेळी दोघांच्या बोलण्यातून समोर आलं.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता म्हणाली, “आमचं जमलं ‘झी मराठी’ वाहिनीमुळेच. मी रेड कार्पेट होस्ट करत होते तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो”. यावर कुणाल म्हणाला, “मला अवॉर्ड मिळाला होता तो घेण्यासाठी मी आलो होतो, तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो. पूर्वीपासून ओळख होती पण ‘झी मराठी’च्या कार्पेटवर भेटलो, आणि बोलणं सुरु झालं”. यावर हर्षदा खानविलकर कुणालची बाजू घेत सूनबाई अंकिता वालावलकरच कौतुक करतात. त्या म्हणतात, “तुझाच हा सेट आहे, तू तुला हवं तेव्हा येऊ शकतोस आणि आमच्या सूनबाईंनाही घेऊन येत जा”.