काही दिवसांपूर्वी अभिनेता किरण गायकवाडने सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. होणाऱ्या पत्नीबरोबर म्हणजेच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत किरणने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर संपूर्ण मालिकाविश्वातून किरणवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. छोट्या पडद्यावर अभिनेत्याचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. तसेच त्याची होणारी बायको वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्रीच आहे. त्यामुळे दोघांच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती आणि अखेर तो क्षण आला आहे. (Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar Sangeet)
किरण आणि वैष्णवी यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावेळी अभिनेत्याने गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला अंगठी घातल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. थाटामाटात साखरपुडा पार पडल्यावर आता दोघांच्या हळदी समारंभाला सुरुवात झाली आहे. हळदीसाठी मांडवात एन्ट्री घेताना किरण आणि वैष्णवीने भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळालं. तसंच यावेळी त्यांचंअ संगीत सोहळाही थाटामाटात पार पडला. यावेळी किरण-वैष्णवी यांनी काही रोमॅंटिम गाण्यांवर हरतके डान्स केला.
या संगीत सोहळ्यात त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना दोघांमध्ये सर्वात आधी मागणी कुणी घातली असा प्रश्न विचारण्यात आला. यावर किरणने हात वर उचलत “मी” असं म्हटलं. त्यानंतर दूसरा प्रश्न असा विचारण्यात आला की, “दोघांमध्ये जास्त आळशी कोण आहे?”. यावर किरणने हात उचलत तो आळशी असल्याचे मान्य केलं. पण त्याची होणारी पत्नी वैष्णवीने “खरंतर दोघेही आळशी नाही” असं उत्तर दिलं. दोघांमध्ये लगेच रागावतं किंवा रुसतं कोण? यावर किरणने हात वर उचलत तो रागावत असल्याचे मान्य केले.
त्यानंतर “सर्वात आधी माफी कोण मागतो?” या प्रश्नावर वैष्णवीने हात उचलत स्वत: आधी माफी मागत असल्याचे सांगितलं. पुढे “सर्वात जास्त प्रेम करणारं कोण आहे?” या प्रश्नावर दोघांनीही हात वर केले. म्हणजेच दोघेही एकमेकांवर सर्वात जास्त प्रेम करत असल्याचे सांगितले. दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा लग्नसोहळा आज म्हणजेच १४ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार व त्यांच्या मित्रमंडळींनी किरण-वैष्णवीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.