Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Haladi : ‘देवमाणूस २’ मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता किरण गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. किरणची सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. किरण अभिनेत्री वैष्णवीसह लगीनगाठ बांधणार आहे. दरम्यान, दोघांच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आलेले पाहायला मिळत आहेत. किरण व वैष्णवीच्या हळद व साखरपुड्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. किरण व वैष्णवीला एकमेकांच्या नावाची हळद लागली असून त्यांच्या हळद समारंभातील फोटो समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये किरण व वैष्णवी हळद लावतानाचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. हळद लावल्यानंतर दोघेही थिरकतानाही दिसले.
किरण व वैष्णवीचा हळदी समारंभातील लूकही खास ठरला. किरणने त्याच्या हळदीसाठी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर वैष्णवीने पिवळ्या रंगाची काठपदरची साडी नेसली होती. हळदीने माखलेल्या अंगाने या नववधूवरच सौंदर्य खूप खुलून आलं होतं. किरण व वैष्णवी यांच्या हळदी समारंभाला कलाकार मंडळींची हजेरी लक्षणीय ठरत आहे. आपल्या मित्र-मैत्रिणीच्या हळदीला या कलाकारांनी धमाल, मस्ती करत रंगत आणलेली पाहायला मिळत आहे.
‘लागिरं झालं जी’ या मालिकेत झळकलेले बहुतांश कलाकार किरणच्या लग्नासाठी कोकणात पोहोचले आहे. किरणच लग्न हे कोकणात आहे. सावंतवाडी पॅलेस येथे त्यांचा हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. किरण व वैष्णवीच्या या शुभ कार्याला सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी पोहोचले आहेत. निखिल चव्हाण, सागर चव्हाण, महेश जाधव, राहुल मगदूम, पूर्वा शिंदे, ओंकार ढगे, अभिनव कुराणे ही कलाकार मंडळी त्यांच्या हळदीत थिरकताना दिसत आहेत. तर त्यांच्याबरोबर या नववधूवरानेही ठेका धरलेला पाहायला मिळतोय.
या कलाकारांनी किरण-वैष्णवीचा साखरपुडा आणि हळदी समारंभातील सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. किरण व वैष्णवीच्या हळदी समारंभातील डेकोरेशननेही साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. फुलांनी सजवलेलं हे डेकोरेशन खूप खास होतं. दोघांच्या साखरपुड्याच्या फोटो व व्हिडीओवरही चाहते व कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.