‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं विजेतेपद पटकावल्यावर सूरज चव्हाणचं नशीब पूर्णपणे बदलून गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘बिग बॉस’च्या शोमधील त्याच्या एन्ट्रीवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. पण घरातील आपल्या स्वभावाने त्याने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं त्याला भरभरून प्रेम मिळालं. त्याच्यातला साधेपणा प्रत्येकाला भावला. अशातच नुकताच त्याचा वाढदिवसही झाला आणि यानिमित्तानेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर तो सर्वांच्या भेटीगाठी घेत आहे. अशातच त्याने नुकतीच केदार शिंदेंची भेट घेतली. सूरज चव्हाण व केदार शिंदेंच्या या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kedar Shinde and Suraj Chavan Meeting)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सूरज व केदार शिंदे यांच्या व्हिडीओमध्ये सूरजने सर्वात आधी केदार शिंदेंना घट्ट मिठी मारली, त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर केदार शिंदेंनी त्याला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू दिली. या सगळ्या गिफ्ट्समध्ये एक खास गोष्ट होती ती म्हणजे देवाच्या पादुका… या पादुका पाहून सूरज भारावून गेला. त्याने केदार शिंदेंचे आभार मानले. हा सुंदर क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करत सूरजने व्हिडीओला “भेटला विठ्ठल माझा…” हे गाणं जोडलं आहे. त्यामुळे सूरज व केदार शिंदेंची ही भेट सर्व चाहत्यांना याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांना सुखावणारी ठरत आहे.
आणखी वाचा – 21 october Horoscope : सर्वार्थ सिद्धी योगामुळे कर्क, तूळ राशीच्या लोकांना मिळणार कामात यश, जाणून घ्या…
केदार शिंदेंनी सूरजला खास गिफ्ट दिलं. या गिफ्टमध्ये एका बॉक्समध्ये मूर्ती असलेली दिसली. याशिवाय सोनेरी रंगाच्या पादुका पाहायला मिळाल्या. सूरज या भेटवस्तूचा प्रेमाने स्वीकार करतो. केदार व सूरज यांच्या या भेटीचा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला असून यावर अनेकांनी “केदार शिंदे सर असंच लक्ष राहु द्या पोरावर”, खुप छान आणि निस्वार्थ प्रेम”, “आयुष्यात फक्त चांगली संगत महत्वाची असते ती तुला आता लाभली भावा असाच पुढे जात रहा”, “लोखंडाला सोनं बनवणारा परीस म्हणजे केदार शिंदे सर” अशा अनेक कमेंट करुन सर्वांनी सूरज व केदार शिंदेंचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांच्या नवीन मालिकेची वेळ जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता घोषित होताच केदार शिंदेंनी त्याच्यासाठी आणखी एक घोषणा केली होती. ती म्हणजे, लवकरच ते सूरज चव्हाणला घेऊन ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात सूरज मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच सूरजला वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी खास भेटवस्तू दिल्या आहेत.