‘कौन बनेगा करोडपती १५’च्या भागात मध्य प्रदेशातील जबलपूर येथील स्पर्धक वर्षा तारा सरोगी हॉटसीटवर बसली होती. वर्षाने गेम सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि १२,५०,००० रुपये जिंकले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी वर्षाला एकत्र डिनरला जाण्याचे वचन दिले होते. KBC 15’ मध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते की, जो कोणी १० पैकी सर्व १० प्रश्नांची अचूक उत्तरे देईल त्याला माझ्यासह डिनरसाठी आमंत्रित केले जाईल. या संपूर्ण सीझनमध्ये केवळ ४ स्पर्धकांना ही संधी मिळाली. त्यापैकी एक मध्य प्रदेशातील जबलपूरची वर्षा होती. (Kaun Banega Crorepati 15)
वर्षा SBIच्या झोनल ऑफिसमध्ये काम करते. जेव्हा वर्षा तारा सरोगी हॉटसीटवर बसली होती तेव्हा तिने बिग बींशी आपली ओळख करुन दिली. हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणाले, “तुम्ही आमच्या पत्नीच्या जन्म झालेल्या गावातल्या आहात”. वर्षा तारा सरोगी सांगतात, “आयुष्यातील ११ वर्षे मला चालता आले नाही. आईने विचार केला की मी अभ्यास केला नाही तर आयुष्य कसे जगणार. मोठ्या कष्टाने त्यांनी मला प्रवेश मिळवून दिला आणि त्यांच्यामुळेच मी आज उभी आहे. मला ही हॉटसीट माझ्या आईला समर्पित करायचे आहे”. तिने सांगितले की, “जेव्हा तिला पोलिओ झाला तेव्हा ती तीन वर्षांची होती”.
बिग बी म्हणतात की, त्यांनी आयुष्यात अनेकदा आनंदाचे अश्रू ढाळले असतील आणि हा दिवस देखील असाच एक क्षण आहे. कारण ही त्यांची ताकद आणि कुटुंबाचा मोठा आधार आहे. वर्षा म्हणाली, “लग्नाचा विचार केला की लोक दोनदा विचार करतात. पण माझे पती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत आणि आम्हाला एक मुलगाही आहे. तो संपूर्ण वेळ माझ्याबरोबर असतो आणि मला अनेकदा प्रश्न पडतो की त्याने मला का निवडले”, असं म्हणत तिने पतीचे कौतुक केले आहे.
आता अलीकडेच बिग बींनी आपले वचन पूर्ण केले आणि वर्षा तारा सरोगी यांना संपूर्ण कुटुंबासह डिनरसाठी आमंत्रित केले. तीन तास चाललेल्या या भेटीत अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण कुटुंबासह घरी जेवण केले. वर्षाने सांगितले की, ती बिग बींच्या घरी पोहोचताच अमिताभ बच्चन यांनी स्वतः तिचे स्वागत केले आणि तिला भेडाघाटचे दृश्यही भेट दिले.