Karisma Kapoor Ex Husband Death : करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ग्लेनडेल येथील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना ५३ वर्षीय संजय यांना हृदयविकाराचा झटका आला. खेळादरम्यान संजय अचानक जमिनीवर कोसळल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.
अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी एका पोस्टमध्ये त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा देत शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर संजयच्या निधनाच्या बातमीवर लोक सतत शोक व्यक्त करत आहेत. संजय कपूर हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते आणि त्यांना पोलो या खेळाची खूप आवड होती. या खेळादरम्यानच त्यांना मृत्यू आला.
आणखी वाचा – “तेव्हा कोणीतरी अतिप्रसंग करतं आणि…”, भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता वालावलकरचं स्पष्टीकरण, म्हणाली, “थट्टा केली पण…”
एकीकडे अहमदाबादमधील विमान अपघातामुळे संपूर्ण देश शोकात आहे, तर दुसरीकडे संजय कपूर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. संजय स्वतः या विमान अपघाताबद्दल खूप दुःखी होते. त्यांनी एक्स वर यासंबंधीची शेवटची पोस्ट केली होती. काही तासांपूर्वी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, “अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबासह आहेत. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो. #plancrash”.
आणखी वाचा – “जर मुलगी झाली असती तर…”, डिलिव्हरीनंतर रेणुका शहाणेला नातेवाईकांकडून वाईट अनुभव, म्हणाली, “वजन कमी करायला…”
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ मध्ये लग्न झाले आणि २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या लग्नापासून त्यांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुले झाली. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने प्रिया सचदेवशी लग्न केले. घटस्फोटानंतरही, करिश्माची मुले वडील संजय कपूर आणि त्यांची पत्नी प्रिया सचदेव यांच्याबरोबर सुट्टीवर जात असत आणि त्यांनी दिवाळीही एकत्र साजरी केली. प्रियाचे संजयबरोबर हे दुसरे लग्न होते आणि तिला तिच्या पहिल्या लग्नापासून सफिरा ही मुलगी आहे. तिचे पहिले लग्न विक्रम चटवालशी झाले होते. प्रियाला संजयपासून अझारियस हा मुलगा आहे.





