कन्नड टेलिव्हिजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं कार अपघातात निधन झाले आहे. हैदराबादच्या मेहबूब नगरजवळ हा अपघात झाला. अभिनेत्रीची कार एका बसला धडकली, असे अहवालात म्हटले आहे. गाड्यांची ही टक्कर इतकी भीषण होती की, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. पवित्रा यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुटुंबासह सिने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथे परतत असताना हा अपघात झाल्याचे माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे. (Pavitra Jayaram Death)
या घटनेत पवित्रा जयरामचा चुलत भाऊ अपेक्षा, चालक श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत हे गंभीर जखमी झाले आहेत. कारचे नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकली आणि नंतर हैदराबादहून वानपर्थीकडे येणारी बस कारच्या उजव्या बाजूला धडकली, असे सांगितले जात आहे. या अपघातात पवित्रा जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पवित्रा जयराम ही कन्नड टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. याशिवाय तिने इतर अनेक भाषांमधील शोमध्येही काम केले आहे. कन्नड टीव्ही इंडस्ट्रीत तिची लोकप्रियता खूप जास्त होती. तेलगु मालिकांमधील आपल्या दमदार अभिनयाने तिचा खूप मोठा चाहतावर्गही आहे. पवित्रा यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या अपघाताबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. टीव्ही इंडस्ट्रीत, विशेषत: कन्नड व तेलुगू मालिकांमध्ये त्यांचे योगदान लक्षात ठेवले जात आहे.
अभिनेते समीप आचार्य यांनी पवित्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांचे दुःख सोशल मीडियावर व्यक्त केले. त्यांनी श्रद्धांजली वाहत असे लिहिले आहे की, “तू नाहीस या बातमीने जाग आली. हे अविश्वसनीय आहे. माझी पहिली ऑन-स्क्रीन आई, तू नेहमीच खास राहशील”.