सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट मराठी चित्रपटांपैकी एक एव्हरग्रीन चित्रपट महून आजही लोकप्रिय आहे. २००४ साली आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. चित्रपटाची कथा, गाणी तसेच कलाकारांच्या भूमिका अशा सर्वच बाबतीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. २००४ साली प्रदर्शित झाला आणि आज इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ तितकीच पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये एसटीतून झालेला मुंबई ते गणपतीपुळे हा भन्नाट प्रवास प्रेक्षकांनी पाहिला होता. (Prashant Damle was part of Navra Majha Navsacha)
या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, जॉनी लीव्हर, रीमा लागू, विजय पाटकर, वैभव मांगले, प्रदीप पटवर्धन, निम्रिती सावंत अशा अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. या कलाकारांबरोबरच अभिनेते जयवंत वाडकर यांनीदेखील ‘नवरा माझा नवसाचा’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. जागे असतानाच घोरणाऱ्या व्यक्तीच्या पात्राने चित्रपटात धम्माल उडवून दिली होती. या कलाकारांमध्ये आणखी एका प्रसिद्ध कलाकाराचाही समावेश होता आणि हा कलाकार म्हणजे प्रशांत दामले. हो! हे खरं आहे की ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये प्रशांत दामलेही असणार होते.
‘नवरा माझा नवसाचा’मध्ये दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांचीही एक महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र काही कारणास्तव ते या चित्रपटात दिसले नाहीत. याबद्दल जयवंत वाडकरांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’मध्ये एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. याबद्दल बोलताना जयवंत वडकरांनी असं म्हटलं की, “नवरा माझा नवसाचा चित्रपटाच्या आधी आम्ही यशवंत नाट्य मंदिर येथे वाचन करायला बसलो होतो. संतोष पवार चित्रपटाची स्क्रिप्ट (संहिता) वाचत होता. तेव्हा वाचन करण्याआधी घडयाळ लावलं आणि काही वेळाने मी आणि विजय पाटकर आम्ही एकमेकांकडे बघितलं. तेव्हा सव्वा तीन तास फक्त वाचान सुरु होतं. याबद्दल आम्ही सचिनला सांगितलं. नुसतं वाचनच सव्वा तीन तास झालं होतं. त्यावर चित्रपट बनणार होता. त्यामुळे तिथेच प्रशांत दामले होते पण त्यांची भूमिका कट करण्यात आली”.
यापुढे जयवंत वाडकर असं म्हणाले की, “नवरा माझा नवसाचा चित्रपटात प्रशांत दामलेचीही एक भूमिका होती. तो येतो, हसवतो आणि अंताक्षरी खेळतो असं होतं. पण ते कट केलं आणि त्यामुळे ‘नवरा माझा नावसाचा’ चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रशांत दामले नाही”. दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.