पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. २२ एप्रिलला (मंगळवारी) पहलगाममध्ये पर्यटक प्रत्येक क्षण एन्जॉय करत होते. क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि तब्बल २६ जणांनी आपला जीव गमावला. धर्माच्या नावाखाली दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आयुष्यभरासाठी दुःख देऊन गेला. आता या हल्ल्याप्रकरणातील एक एक व्हिडीओ समोर येत आहे. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. व्हिडीओमध्ये पर्यटक ऋषी भट् झिपलाईन करतानाचा आनंद लुटत आहे.मात्र त्याचदरम्यान गोळीबार होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र यामधून एक संशयास्पद बाबही समोर आली. याबाबत ऋषीनेही स्वतः भाष्य केलं. (pahalgam terror attack viral video)
झिपलाईन करतानाचा गोळीबार झाला अन्…
ऋषि म्हणाला, “दुपारीच आम्ही पहलगामला पोहोचलो होतो. आम्ही काही व्हिडीओ शूट केले. काही फोटोही काढले. पण तेव्हा सगळं काही ठिक होतं. आम्ही झिपलाईनचं तिकिट काढलं. आमच्या आधी एकाच कुटुंबातील तीन लोकांनी झिपलाईन पूर्ण केलं. त्यानंतर आणखी तीन लोक होते. यानंतर आमचा नंबर होता. सगळे लोक झिपलाईन करता खाली पोहोचले. माझी बायको व मुलगाही पोहोचला. फक्त मीच बाकी होतो”.
दोन्ही कुटुंबातील पुरुषांवर गोळीबार
“जेव्हा मी झिपलाईन सुरु केलं तेव्हाच गोळीबार सुरु झाला. जवळपास १.२८ वाजले होते. मी मस्तीच्या मूडमध्ये होतो. खाली काय प्रकार सुरु आहे? याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. जेव्हा मी झिपलाईन पूर्ण करुन खाली पोहोचलो तेव्हा माझ्या पायाखालची जमिनच सरकली. माझ्या पत्नीने मला सांगितलं की, आपल्या पूर्वी झिपलाईन करुन खाली उतरणाऱ्या दोन कुटुंबातील पुरुषांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. धर्म विचारुन सहा फुटांच्या अंतरावर उभं राहून गोळीबार केला”.
‘त्या’ सात सेकंदांमुळे माझा जीव वाचला
पुढे ते म्हणाले, “माझी बायको व मुलगा आधी पोहोचले. मी त्यांच्यानंतर काही वेळाने खाली पोहोचलो. दहशतवाद्यांचं पुढचं टार्गेट बहुतेक मीच होतो. मात्र मला नशिबाने वाचवलं. झिपलाईनला माझाच नंबर होता. पण त्याआधी दोन मुलं आली आणि मला म्हणाले आधी आम्ही जाऊ का?. मी त्यांना सहज जाऊ दिलं. त्या सात मिनिटांमुळे माझा जीव वाचला”.
आणखी वाचा – मॅगी खाताना नवऱ्याला मारलं, ते पाहून पत्नीने दहशतवाद्यांकडे मरण मागितलं अन्…; पहलगाममध्ये नववधूने फोडला टाहो
पाहा व्हिडीओ
जमिनीवर मृतदेह पाहिले, खड्ड्यात लपलो
“झिपलाईन करताना जवळपास २० सेकंद मी माझ्या मस्तीच्या मूडमध्ये होतो. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दहशतवादी हल्ला सुरु आहे. मैदानामध्ये मी लोकांना खाली पडताना बघत होतो. जसं झिपलाईन संपली मी हुक काढलं आणि खाली उडी मारली. बायको व मुलासह मी पळू लागलो. पळत असताना एक अशी जागा समोर आली जिथे मोठा खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये आधीच काही लोकं लपले होते. मग आम्हीही तिथेच लपलो. सात ते आठ मिनीटांनंतर आम्ही तिथूनही पळालो. दरम्यान पुन्हा गोळीबाराचा आवाज सुरु झाला. ३० ते ३५ जणं पळत असावेत. त्यामधीलही काही लोकांना गोळी लागली होती”.
तो संशय आला अन्…
झिपलाईन ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीला बहुदा या हल्ल्याची कल्पना होती असं म्हटलं जात आहे. व्हिडीओमध्ये तो ऋषी भटला झिपलाईनद्वारे खाली पाठवताना अल्लाह हू अकबर तीनवेळा म्हणताना दिसत आहे. यातविषयी ऋषी म्हणाला, “माझ्या पुढे नऊ जणांनी झिपलाईन केलं. मात्र माझ्याचबवेळी तो तीनवेळा अल्लाह हू अकबर म्हणाला. म्हणूनच मला थोडा संशय आला. अल्लाह हू अकबर तो बोलला आणि त्यानंतरच गोळीबार झाला”. ऋषी भट्ट यांचा जीव थोडक्यात वाचला. मात्र त्या झिपलाईन ऑपरेटरचा यामध्ये काही हात होता का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.