Pune Bridge Collapse : पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा या गावातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने काही पर्यटकांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जणांना वाचवण्यात बचाव पथक व पोलिसांना यश मिळालं आहे. दरम्यान, या घटनेवरुन सामान्य जनता व विरोधी पक्षांनी तसेच कलाकार मंडळींनी सरकार तथा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मदतकार्य सुरु असतानाच या दुर्घटनेसंदर्भातील धक्कादायक तपशील समोर आला आहे. येथील प्रत्यक्षदर्शीने खळबळजनक खुलासा केला आहे. कुंडमळा येथील पूल पडण्यासाठी पुलावर झालेली गर्दी कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही गर्दी वाढण्यामागे पुलावर आलेल्या दुचाकी कारणीभूत असल्याचे या अपघातात जखमी झालेल्या पर्यटकांनी सांगितले आहे. यामुळे सरकार इतकेच बेभान नागरिक, पर्यटकही या घटनेला जबाबदार आहेत.
आणखी वाचा – दहिसर टोल नाक्यावरील ट्राफिकमुळे जुई गडकरी त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाली, “या वाहतूक कोंडीत…”

या दुर्घटनेतून बचावलेल्या योगेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या दुर्घटनेवेळचा थरार सांगितला. कुंडमळा पूल इंद्रायणी नदीत कोसळला तेव्हा योगेश आणि त्यांची पत्नी पूलाच्या मध्यभागी होते. योगेश यांनी म्हटले की, “मी मृत्यू डोळ्यांदेखत पाहिला. पूल कोसळला तेव्हा पुलाच्या मध्यभागी होतो. ज्या तिघांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू मी जवळून पाहिला. लोक सांगत होते घाई करु नका, जाऊ नका, पण कोणी ऐकलं नाही आणि हे सगळं घडलं”, असे योगेश यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या कुंडमळा येथे नवीन पुलाच्या बांधकामास मंजुरी देऊन निधी देखील देण्यात आला होता. इतके असूनही हे काम का सुरु झाले नाही असा सवाल आता सरकारला केला जात आहे. रात्री उशिरा पुलाचा सांगाडा बाहेर काढला असून, त्याखाली कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व खर्च सरकारतर्फे केला जाणार आहे.





