Bollywood singing industry issues : सिनेइंडस्ट्रीतील गायक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच अरजीत सिंगसारख्या सुप्रसिद्ध गायकाने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक कलाकार मंडळींनी आणि गायकांनी त्याच्या या निर्णयावर आपली मतं मांडली. अनेकांना अरजीत सिंगचा निर्णय पटला तर काहींनी यावर टिपण्णी केली. यानंतर गायकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो का असा प्रश्न साऱ्यांच्या मनात निर्माण झाला. आणि यावर अनेकांनी भाष्य करायला सुरुवात केली. यावर आता मराठमोळ्या गायकानेही भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे.
इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंतने अनेक रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठीसह त्याची हिंदी गाणीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ‘बिग बॉस’मराठीच्या घरातही त्याने उत्तम खेळ खेळत साऱ्यांची मनं जिंकली. गाण्यांबरोबर अभिजीत सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच अभिजीतने गायकांच्या मानधनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Photo : राकेश बापटबरोबर ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात?, ‘त्या’ फोटोंनी चर्चांना उधाण
‘पेंटाराईज स्टुडिओज’च्या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, अभिजीतला इंडस्ट्रीतील गायकांच्या मानधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिजीत म्हणाला, “लोकांना गायक चित्रपटापेक्षा मोठा व्हायला नको असतो. म्हणूनच गायकांना ठराविकच पैसे दिले जातात. आजही गाण्यांसाठी संगीतकार आणि गायकांना रॉयल्टी मिळत नाही. बिड्डूने (ब्रिटिश संगीतकार आणि गीतकार) ‘लफ्झों में’सारखं गाणं केलं, तसंच त्याने पाश्चिमात्य देशांत काही गाणी केली. त्या फक्त दोन गाण्यांच्या रॉयल्टीवर तो आयुष्यभर आरामात जगू शकतो. पण आम्हाला आमचा उदरनिर्वाह चालेल, एवढेही पैसे मिळत नाहीत”.
पुढे अभिजीत असंही म्हणाला, “ही संपूर्ण सिस्टीमच अशी बनवली आहे. गायक स्वतःच संधीसाठी हावरे झालेले असतात. त्यांना वाटतं, ‘माझ्या आवाजात गाणं आलं आणि एखादा मोठा सुपरस्टार गाण्यावर लिपसिंक करत असेल, तर ते गाणं मी आयुष्यभर वापरु शकतो. त्यामुळे गायकांना पैशांपेक्षा संधी महत्त्वाची वाटते. एखाद्या ठराविक निर्मात्याबरोबर काम करायचं असतं. म्हणून जेवढे पैसे मिळतात तेवढेच आम्ही घेतो, कारण आपण नकार दिला तर दुसरंच कोणी ते काम करतं. यामुळे आमचं खूप शोषण होतं”.




