Husband Tortured His Wife : बरेचदा असं होतं की, आपली बायको सुंदर असावी अशी प्रत्येक नवऱ्याची अट असते. लग्नापूर्वीच ही नवरेमंडळी बायको कशी हवी या अटी समोर ठेवताना दिसतात. लांबसडक केस, नाकी डोळी छान, गोरापान रंग, सडपातळ अशा अनेक अटी मुलांकडून रंगरुपावरुन ठेवण्यात येतात. आणि त्यांच्या या अटींमुळे अनेक मुलींना नाहक त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच नवऱ्यांची अशी अपेक्षा असते की त्यांच्या बायकांनी एखादया सेलिब्रिटीसारखं दिसावं. असं वाटणं आणि असं असणं यांत बराच फरक आहे. बरं. असं वाटणं वावगं नाही पण अशाने त्या महिलांना त्रास सहन करावं लागणं हे पार चूक आहे.
हो. आपली बायको बॉलिवूड सेलिब्रिटीसारखी (Bollywood Celebrity) दिसावी म्हणून बायकोला 3-3 तास जिममध्ये एक्सरसाईज करायला लावणाऱ्या नवऱ्याची सध्या चर्चा सुरु आहे. आपली बायको नोरा फतेही सारखी दिसावी, नोरा फतेही सारखी तिची फिगर व्हावी म्हणून तो तिला चक्क उपाशी ठेवायचा, इतकंच नाहीतर या काळात त्या इसमाने तिला गर्भपातही करायला भाग पाडलं. आणि सततच्या या त्रासाला कंटाळून त्या पीडित महिलेने चक्क पोलिसांत तक्रार करत आपली व्यथा सांगितली.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिचा नवरा तिला दररोज टोमणे मारतो. अभिनेत्री नोरा फतेहीसारखी (Nora Fatehi) दिसण्यासाठी तो तिला दररोज तीन-तीन तास जिममध्ये व्यायाम करायला भाग पाडतो. पीडित महिलेचा नवरा फिजिकल एजुकेशन टीचर आहे. मार्च महिन्यात मेरठ येथे राहणाऱ्या एका शिक्षकासह तिने लग्न केलं. लग्नामध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी २४ लाखांची महिंद्रा स्कार्पिओ कार, रोख रक्कम आणि दागिने दिले होते. या लग्नात पीडितेच्या वडिलांना ७५ लाख रुपये खर्च आला होता. लग्नात इतका खर्च करून सुद्धा शिक्षक नवऱ्यानं पीडितेला त्रास देणं सुरु ठेवलं.
आणखी वाचा – प्रेक्षकांच्या लाडक्या गोपी बहूने गुपचूप उरकलं लग्न, वयाच्या ३९व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो समोर
‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी पीडितेचा नवरा एका मुलीशी चॅट करत होता, त्याबद्दल विचारलं असता त्यानं थेट मारहाण करायला सुरुवात केली. पीडितेनं सासरच्यांवरही आरोप आणि सांगितलं, तिचे सासू-सासरे तिला आणि तिच्या पतीला एकत्र कुठेच जाऊ द्यायचे नाही. घरातल्या कामांवरुन तिची सासू तिला विनाकारण त्रास द्यायची.





