Holi Special Article : सखे सरक की गं तिकडे तू तरी… असं बोलून ट्रेनमधील माझी मैत्रीण रेखाने सीटवर बसताच सुटकेचा श्वास सोडला. मीही आपसुकच तिला विचारलं काय गं आज एवढी घाईत ट्रेन पकडलीस… आणि अगदी तोऱ्यात मला सरकायला सांगतिलंस. एवढं सकाळी सकाळी बिनसलंय काय?. मग काय आमच्या रेखाने मनात साचलेलं होतं नव्हतं तेवढं बोलायला सुरुवात केली. अगं सकाळी घरातून बाहेर पडायच्या आधी सासूचे टोमणे, होळी सुरु होण्यापूर्वीच नवऱ्याची दारू पार्टी… हा राडा कमी होता की काय तर आत्येसासूबाई आल्या आणि घरात थैमान. म्हणे तुझा नवरा सतत दारू पितो हा तुझाच दोष… आता मला सांग माझा दोष कसा?…
घरात मी एकटीच कमावणारी. खायला चार तोंडं. त्यात माझा दीर पण शिक्षणाचा… जॉब करूनही पैसे पुरत नाहीत म्हणून मी सकाळी चार जणांना चपाती-भाजीचा डब्बा बनवून देते. त्यात माहेरी माझे वडील आजाराने व्याकुळ असतात… गेली चार वर्ष ते जागेवरच आहेत. त्यात मी एकुलती एक. तेही घर मलाच बघायचंय. माझ्या मेलीचं नशिबच फुटकं ते मी याच्याशी हट्टाने लग्न केलं आणि फसले. ना कोणाचा मानसिक आधार ना आर्थिक…
आणखी वाचा – ‘पाऊस’ वेबसीरिजची गगनभरारी, ‘मटा सन्मान’मध्ये पुरस्कारांचा वर्षाव, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली…
रेखा ओघाओघात सगळंच बोलून गेली तेही पहिल्यांदा… चेहऱ्यावर सतत गोड हास्य असणाऱ्या रेखाचं आयुष्य असं असेल याची कल्पनाही मला नव्हती. रेखाचं बोलणं आमच्या समोरच्या सीटवर बसलेल्या काकू लक्ष देऊन ऐकत होत्या. तिचं बोलणं जसं संपलं काकू म्हटल्याच पोरी कष्ट आपल्याला चुकलेत काय… बाय माझं लग्न झालं तेव्हा सासूने ताटात वाढलेली अर्धीच चपाती आम्ही खायचो. पुढे भूक आहे म्हणून मागितली की, शिव्यांचा भडीमार. नवऱ्याला तर हे सगळं बोलायची सोय नव्हती. एकदा काय तर हे काम मी करणार नाही म्हटलं तर गरम पाण्याचा टोपच अंगावर उलटला सासूबाईंनी… तेव्हाचा सासूरवास निमुटपणे सहन केला गं… लग्नाच्या तीन वर्षातच आमचे हे झटक्याने गेले. सासरच्यांनी मलाच काळ्या पायाची म्हणत हाताला धरून बाहेर काढलं…
आणखी वाचा – नोकरी सांभाळत इंडस्ट्रीत काम करण्याचा ध्यास, ‘मैत्रीचा ७/१२’ मधील आदित्यचा प्रेरणादायी प्रवास
माहेरची वाट पकडली आणि लोकांची धुणी-भांडी करुन आयुष्य काढलं. १५ वर्ष झाली पाय झिझवतेय… लोक काय म्हणतील म्हणून दुसरं लग्नही केलं नाही. राहिले आई-वडिलांच्याच पदरात. त्यांनाच सांभाळतेय हेच काय ते सुख फक्त आयुष्यात… बापरे रेखा आणि त्या काकूंचे अनुभव एकदम माझ्या अंगावरच आले. ट्रेनमध्ये बसल्यानंतर होळीचं प्लॅनिंग करणारी मी वेगळ्याच दुनियेत गेले. यांच्यासाठी काय होळी आणि काय सण… प्रत्येकाने आपल्या माणसांच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरावे आणि आनंदाने या रंगांची उधळण करावी… म्हणजेच अशा कित्येक रेखा व त्या काकू प्रत्येक सण आनंदाने साजरा करतील बरोबर ना…