Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती वेबसीरिज म्हणजे ‘मैत्रीचा ७/१२’. या वेबसीरिजचं पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उस्तुकता होती. अखेरीस ‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियाद्वारे तर ‘मैत्रीचा ७/१२’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचनिमित्त या सीरिजच्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. या सीरिजमध्ये आदित्य हे पात्र साकारणारा तेजस कुलकर्णी याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करुया आजच्या गप्पा…
आदित्य या पात्रातून तुला स्वतःला काय शिकायला मिळालं?, आणि तू या पात्रातून कसा घडत गेलास?
आदित्य हे पात्र ओव्हर रिकंटेड आहे. तो कोणतीच गोष्ट विचार करून करत नाही. खोडकर, मस्तीखोर असं हे पात्र आहे. स्ट्रगलर कलाकार असल्याने मी एक गोष्ट लक्षात ठेवली होती ती म्हणजे त्याच्यातील जी लोकांसमोर स्वतःला परफॉर्म करायची ऊर्जा आहे ती आदित्यने पूर्ण वेबसीरिजमध्ये कायम ठेवली. त्यामुळे प्रत्येक सीनमध्ये आदित्य कॅमेरा समोर आहे असं समजून परफॉर्म करताना दिसत आहे. आणि कलाकार म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल हे आदित्यला चांगले माहित आहे.
जॉब करुन तू अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेस?, या दोन्ही क्षेत्रात काम करताना तुझी तारेवरची कसरत होते का?
जॉबच्या बाबतीत मी अगदी कमी बोलेन. दोन्ही क्षेत्रात काम करताना मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही. कंपनीकडूनही माझ्या कामाबाबत कधीच तक्रार आली नाही. मी थोडी जास्त मेहनत घेतली त्यामुळे या दोन्ही क्षेत्रात काम करणं सोयीस्कर झालं.
आदित्य आणि तुझ्यात नेमकं काय साम्य आहे?
आदित्य आणि माझ्यात साम्य फार कमी आहे. आदित्य कोणताही निर्णय घेताना विचार करत नाही. पण मी खूप विचार करुन निर्णय घेतो. मला योग्य वेळ कोणती आहे हे अचूक कळतं पण आदित्यच तसं नाही आहे. आदित्यला आता मार्ग दाखवणाऱ्या एका गुरुची गरज आहे. तेजस आणि आदित्यमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे खोडकरपणा.
‘मैत्रीचा ७/१२’चे शूट सुरु असतानाचा धमाल किस्सा?,वा आठवणीतला एखादा किस्सा?
‘मैत्रीचा ७/१२’च्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से आहेत. गाण्याच्या शूटिंगदरम्यानच्या, गावाकडे केलेल्या शूटिंगच्या बऱ्याच आठवणी आहेत. बरेचदा काय व्हायचं तर कधी कधी एकत्र सीन लागायचे नाहीत. काहीवेळा छायाच शूट असायचं तर काही वेळा आम्हा सगळ्यांचं असायचं आणि ती रिकामी असायची. एकदा छाया वर एपिसोड होता आणि तिचं दिवसभर शूटिंग होतं. बसून राहायचं म्हणून आम्ही पाचजण फेरफटका मारायला गेलो आणि तिकडचे फोटो वगैरे पोस्ट केले. हे पाहून छाया रुसली. आमच्यात ती सगळ्यात लहान आहे. तिला समजवताना माझ्या अक्षरशः नाकीनऊ आले.
‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजने तुला काय शिकवलं?, तुझ्यात तेजस म्हणून नेमका काय बदल झाला?
‘मैत्रीचा ७/१२’ ही सीरिज मित्रांची आहे. दिवसभरात एक मित्र म्हणून एखादा प्रॉब्लेम आपण सोडवला आहे तर तेजसच्या आयुष्यातही असे काही मित्र आहेत, ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली आहे, कधी मी त्यांच्यासाठी धावून गेलो आहे तर कॉलेजच्या दिवसांतील ही मैत्री मी कुठेतरी आता मिस करतोय. या मैत्रीची आठवण मला या सीरिजने करुन दिली.
‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर तुझ्या कुटुंबाकडून कसा प्रतिसाद मिळाला?
एपिसोड प्रदर्शित होण्याआधीच सीरिजच्या लिंक माझ्या घरच्यांनी नातेवाईकांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना पाठवलं. आई-बाबा खूप खुश होते. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. सांगायचं झालं तर या सीरिजच चित्रीकरण १ तारखेपासून होणार होतं आणि माझ्या घराचं त्याचं दिवशी शिफ्टिंग होतं. मी एकुलता एक असल्याने मुलगा म्हणून ही माझी जबाबदारी होती. त्यावेळी मी आई-बाबांना प्रॉडक्शन टीमशी बोलून बघतो असं म्हटलं पण त्यांनी तू जा, आम्ही बघतो असं म्हटलं. यावेळी मला खूप भारी वाटलं. तीन महिने आम्ही एकमेकांसोबत नसलो तरी कायम ते रोज रात्री शूट झाल्यानंतर माझ्याशी बोलायचे, त्यामुळे नेहमीच ते मला माझ्याबरोबर आहेत असं वाटायचं. त्यांना या सीरिजमध्ये मला पाहून खूप आनंद झाला आहे.
‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांनी का पाहावा?, आणि पुढील एपिसोडमध्ये कोणत्या गमतीजमती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत?
‘मैत्रीचा ७/१२’ ही अशी कलाकृती आहे, ज्यात आताच्या समाजात बरीच नकारात्मकता आहे, अशा वातावरणात आणि बोल्ड, विचित्र, वा त्याच त्याच विषयांमध्ये ही एक वेगळी अशी कलाकृती समोर आली आहे. ही सीरिज तुम्ही तुमच्या कुटुंबासह, मित्रांसह बसून पाहू शकता. तसेच ही सीरिज नक्कीच तुमच्या अनेक आठवनींना उजाळा देईल. आणि तुम्ही तुमच्या मित्रांसह प्रत्येक पात्र रिलेट करु शकता.