Ashish Warang Passed Away : मराठी सिनेविश्वात एकामागोमाग एक धक्कादायक बातमी कानावर येत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. तर त्यापाठोपाठ लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन झाले. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याची निधनाची बातमी कानावर आली आहे. हिंदी आणि मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. ठाणे, वर्तक नगर, येथे त्यांचे निधन झाले असल्याचं समोर आलं आहे.
आशिष वारंग यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना कावीळ या आजाराने ग्रासले होते. या आजारातून ते सुखरूप बाहेरही आले. मात्र, आज दिनांक. ५ सप्टेंबर रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आजवर आशिष वारंग यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर राज्य केलं. याचबरोबर त्यांनी मराठी कलाविश्वातही काम केले. मात्र सर्वाधिक काम हे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत केले आहे.
आणखी वाचा – “ट्रोलिंग करणं सगळ्यात सोपी गोष्ट”, प्रथमेश परबच्या पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, “खूप गरजेचं आणि…”
आशिष वारंग यांनी काम केलेल्या चित्रपटांची यादी ही खूप मोठी आहे. यांत ‘सिंबा’, ‘सूर्यवंशी’, ‘दृश्यम’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘हिरोपंती’, ‘बॉंबे’, ‘सर्कस’, ‘मर्दानी’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर ‘धर्मवीर’, ‘तांडव’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.





