गेल्या काही दिवसांपासून दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचं कुटुंब चर्चेत आलं होतं. सोशल मीडियावर त्याच्या आई-वडिलांची बरीच चर्चा रंगत आहे. अशातच सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवालाच्या पालकांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. यानंतर त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धू मुसेवालाच्या धाकट्या भावाला पाहण्यासाठी पंजाबी गायक गुरदास मान रविवारी रुग्णालयात पोहोचले. गुरुदास मान यांनी त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यासाठी दिवंगत सिद्धू मुसेवाला यांच्या घरी भेट दिली. (Gurdas Maan On Sidhu Moosewala Younger Brother)
प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरदास म्हणाले, “आजचा दिवस विशेष आनंदाने भरलेला आहे. त्यांचं कुटुंब खूप आनंदी आहे. या मुलाच्या आगमनानंतर सिद्धू मुसेवालाच्या पालकांना शांतता व दिलासा मिळाला आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की आई-वडील आणि मुले नेहमी निरोगी राहतील. या बातमीने सिद्धूचे चाहतेही खूप खूश आहेत”.
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत म्हटलं की, त्यांनी दिवंगत रॅपरच्या धाकट्या भावाचे स्वागत केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धूच्या आईने मुलाला जन्म देण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन थेरपी (IVF) ची मदत घेतली होती. तत्पूर्वी, बलकौर सिंग यांनी वयाच्या ५८व्या वर्षी पत्नीच्या गर्भधारणेच्या वृत्ताचे खंडन केले होते आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले होते. त्यांनी लिहिले, “आम्ही सिद्धूच्या चाहत्यांचे आभारी आहोत ज्यांना आमच्या कुटुंबाची काळजी आहे. परंतु आम्ही विनंती करतो की कुटुंबाविषयी इतक्या अफवा पसरत आहेत की त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. जी काही बातमी असेल, ती कुटुंब तुम्हा सर्वांना सांगेल”.
२८ वर्षीय सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर ३०हून अधिक राउंड गोळीबार केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसामधून निवडणूक लढवली होती, मात्र आम आदमी पक्षाच्या विजय सिंगला यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.