Gulkand Trailer : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘गुलकंद’ चित्रपटाची. ‘गुलकंद’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. रॉमकॉम कथानक असलेल्या चित्रपटाच्या आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी सिनेसृष्टीतील चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग हे नेहमीच पाहायला मिळतात, आता देखील हा गुलकंद मार्फत केलेला नवा प्रयोग चित्रपटगृहात लवकरच पाहायला मिळाणार आहे. गुलकंद हा मल्टीस्टारर चित्रपट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा असणार आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह या चित्रपटाचा आस्वाद प्रत्येकाला घ्यायला मिळणार आहे. तसेच तगड्या स्टारकास्टने या चित्रपटात नेमकी काय धमाल केली आहे याची प्रचिती ट्रेलरवरून येतेय.
‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि ‘वेटक्लाऊड प्रोडक्शन्स’ निर्मित ‘गुलकंद’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचा ट्रेलर ९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. ‘गुलकंद’मध्ये सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, प्रसाद ओक आणि ईशा डे यांची जोडीही प्रथमच एकत्र दिसणार आहे. या दोन अफलातून जोडप्यांची कहाणी ‘गुलकंद’मध्ये पाहायला मिळेल.
आणखी वाचा – कुणाल कामराला ‘बिग बॉस’ची ऑफर, शोमध्ये एन्ट्री करण्यावरुन म्हणाला, “या शोमध्ये जाताना…”
“१ मे रोजी मिळणारा गुलकंद आहे संसारात मुरलेल्या प्रत्येकासाठी… एकदा चाखाल तर परत परत मागाल”, असे कॅप्शन देत ‘गुलकंद’चा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. सई आणि समीर यांनी ढवळे कपलची भूमिका तर माने कुटुंबाच्या भूमिकेत प्रसाद आणि ईशा आहेत. त्यांच्या मुलांचे एकमेकांवर प्रेम जडल्याचे दाखवण्यात आले आहे, मात्र त्यांचे लग्न जुळवताना नीता ढवळे (सई ताम्हणकर) आणि गिरीश माने (प्रसाद ओक) यांची लग्नापूर्वीची मैत्री असल्याचे समोर येते. नीताची ती लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपल्याचेही ट्रेलरच्या सुरुवातीला स्पष्ट झाले. मात्र रागिणी मानेच्या (ईशा डे) डोक्यात संशयाचा किडा शिरतो आणि ती मकरंद ढवळेकडे (समीर चौघुले) नीता आणि गिरीश यांच्यावर नजर ठेवण्यासाठी मदत मागते.
इतक्या वर्षांच्या गुलकंदाप्रमाणे मुरलेल्या या जोड्यांच्या संसारात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे खरोखर मीठाचा खडा पडला आहे का की, हा केवळ गैरसमज आहे हे चित्रपट प्रदर्शनानंतर स्पष्ट होईल. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात या चार सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, इशा डे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे ही कलाकारांची फौज दिसणार आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.