Avadhoot Gupte On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिनांक २८ जानेवारी २०२६ बुधवार रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यभरात अजित दादांचे कार्यकर्ते, राज्यातील नेतेमंडळींकडून शोक व्यक्त होत आहे. राज्याच्या राजकारणातील आजचा काळा दिवस अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांबरोबरच कलाकार मंडळीही अजित पवार यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. यानंतर आता सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यानेही पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या. अवधूतने आजवर सर्वच पक्षांसाठी काम केलं आहे. पक्षांची गाणी लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासाठीही त्यांनी बरीच गाणी लिहिली.
अवधूत गुप्तेनं अजित पवार यांच्यासाठी केलेलं शेवटचं गाणं शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भावुक होत त्याने लिहिलं, “दादा.. “अजितदादांचे देऊया नारे..” हे गीत या महापालिका निवडणुकांच्या काळात मी तुमच्यासाठी गायलेलं शेवटचं गीत ठरलं. अगदी या गीतानंतर सुद्धा तुमच्याशी झालेल्या फोनवर तुम्ही केवढं कौतुक केलंत माझं. तेव्हा कुणाला माहीत होतं की, ते आपलं बोलणं शेवटंच असणार आहे म्हणून…निवडणूक प्रचार गीते (political songs) हा जरी अनुप्रयुक्त कले (applied arts) चा भाग असला तरी, ते बनवणारे गायक-वादक हे कलाकारच असतात आणि कलाकाराला जगण्यासाठी पहिली लागते ती म्हणजे ‘दाद’. हे तुम्हाला नीट ठाऊक होतं. म्हणूनच “मी राष्ट्रवादी- मी महाराष्ट्रवादी”, “राष्ट्रवादी लयभारी”, “अजिंक्य भगिनी अजित भगिनी”, या आणि अशा अनेक गाण्यानंतर तुम्ही मला भरभरुन दाद दिलीत”.
आणखी वाचा – “हक्काचा माणूस गमावला…”; अजित पवारांच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हेंची दुःखद पोस्ट, म्हणाले, “डोळ्यात अश्रू…”
पुढे अवधूतने असं म्हटलं, “आज महाराष्ट्राने एक निष्णात राजकारणी, एक धडाडीचा कार्यकर्ता, एक जाणता नेता, एक लाडका भाऊ गमावला आहे. पण त्याचबरोबर आमच्यासारख्या कलाकारांनी एक रसिक श्रोता आणि एक दिलदार आश्रयदाता गमावला आहे हे नक्की! दादा.. जिथे जाताय तिथे सुखी रहा. याच शुभेच्छा. हीच श्रद्धांजली”, असं म्हणत अवधूतनं अजित पवार यांना आदरांजली अर्पण केली आहे.




