Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 मधील स्पर्धकांमध्ये जोरदार वाद सुरु असलेले पहायला मिळत आहेत. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांची वागणूक पाहून अनेक प्रेक्षक मंडळींसह अनेक कलाकार मंडळींनीही या स्पर्धकांविरोधात भाष्य करायला सुरुवात केली. स्पर्धकांचं चुकीचं वागणं साऱ्यांना खटकत असल्याचं दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांची गैरवर्तणूक पाहून आता कलाकार मंडळीही आवाज उठवताना दिसत आहेत. आजवर अनेक कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया देत ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या एका मुद्द्यामुळे मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे.
टास्कदरम्यान स्पर्धकांकडून मालवणी भाषेवर झालेल्या अपमानावरुन मराठमोळ्या अभिनेत्याने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. कोकणकन्या अंकिताचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. ‘बिग बॉस’मध्ये अंकिताला पाहून अभिजीतने तिला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र आता अंकितावरुन झालेल्या बाचाबाचीवर अभिजीतने स्पर्धकांना सुनावले आहे. मालवणी भाषा नॉन महाराष्ट्रीयन आहे हे स्पर्धकांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे.
“मालवणी ही मराठी भाषा नाही? #बौद्धिक दिवाळखोरी”, असं म्हणत त्याने कॅप्शनमध्ये “कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत? हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा, मराठी भाषा वाटत नाही. हे स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात, ती भाषा, मराठी म्हणून आम्ही चालवून घेतोच आहोत की. देवा महाराजा, यांका BiggBossMarathi5 च्या घरातून, हुसकून भायेर काड आनी ‘मालाडच्या मालवणीत’ नेऊन सोड महाराजा, व्हय महाराजा”, असं म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात मालवणी भाषेचा अपमान?, ही मराठी भाषा नसल्याचं निक्कीकडून जाहीर, अंकिताला डिवचलं
‘बिग बॉस’ मध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे हे साऱ्यांना ज्ञात आहे. दरम्यान ‘बिग बॉस यांनी स्पर्धकांना नुकत्याच दिलेल्या टास्कमध्ये बेबीसह मराठी भाषा बोलायची असते. यावेळी अंकिता बाळाला घेऊन बसलेली असते. तेव्हा ती मालवणी भाषेचा उच्चार करते. टास्कमध्ये हे चालणार नाही, मालवणी भाषा मराठी नाही आहे असं निक्की, वैभव यांचं म्हणणं असून त्यांच्याकडून मालवणी भाषेचा अपमान झालेला पाहायला मिळत आहे.