छोट्या पडद्यावरून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत रंगभूमीच्या पडद्यापासून चित्रपटाचा मोठा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी. टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सुव्रतने रंगभूमीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत सुजय साठे ही भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यानंतर ‘शिकारी’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा नावाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियाद्वारेही तितकाच चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावर तो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपपर्कात राहत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आईबरोबरचे लंडनमधील फोटो शेअर केले आहेत. याशिवाय एक आईच्या लंडनवारीबद्दलची एक खास पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढवतानाही आई-बाबांनी, नेहेमीच मला अनुभवाच्या पातळीवर सकस व सुंदर असे काय मिळेल याची काळजी घेतली. खिशाला खार लावून, धाडस करुन उत्तमोत्तम पुस्तके, चित्रपट व नाटक माझ्या बालपणाच्या ओंजळीत भरभरुन ओतली. यात स्वतःच्या इच्छांना मुरड घातली. मी माणूस म्हणून व कलाकार म्हणून जे काही थोडेफार कमावले त्यात या बालपणी मिळालेल्या विविधरंगी अनुभवाच्या कंपास पेटीचा सिंहाचा वाटा आहे”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “आता आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही आई नेटाने, स्वाभिमानाने आयुष्याचा एक-एक धागा विणत असते. यात आता तिला नवे अनुभव देण्यासाठी माझ्यावर राज्य आहे. असे वाटते की, मला कामामुळे, कुतूहलाने प्रौढ आयुष्यात जे काही नवे अनुभव आले. त्यात माझ्या आई-वडिलांना भागीदार करुन घेता आले पाहिजे. आपल्या चष्म्यातून जे आता नवे जग आपल्याला दिसते त्याची चव त्यांनाही चाखून बघायला मिळेल यासाठी मी प्रयत्नशील असलो पाहिजे. आता बाबा नाही पण म्हणून आईने माझ्या नजरेतून लंडन बघावे अशी तीव्र इच्छा होती. अखेर या उन्हाळ्यात सगळे जुळून आले”.
आणखी वाचा – मेष, वृषभ व कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा असेल, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या…
यापुढे त्याने आईच्या लंडनवारीबद्दल असं म्हटलं की, “आईच्या लंडनवारीची तयारी करायला घेतली. भरपूर पायपीट करायची असल्याने तिला बूट घ्यायचे ठरले. तिच्या पायाचे AI मॅपिंग करून वगैरे अगदी अद्ययावत बूट घेतले. पण ते घातल्या घातल्या आईचा थोडा तोल गेला. तिने आयुष्यात पासष्टव्या वर्षी प्रथमच बूट घातले होते. आजवर याआधी आईने कधी बुटच घातले नाहीत. इतकी बारीक आणि तरीही मोठी गोष्ट कधी माझ्या ध्यानातच आली नव्हती. आपल्या आधीच्या पिढीने साधं जगायची साधना केली. त्याचा प्रचंड आदर आहेच. ती मूल्य हरवू न देता त्यांनीही थोडं भोगावं आणि त्यांना त्याची चोरी वाटू नये अशी तजवीज आपण त्यांच्यासाठी करावी”.
आणखी वाचा – धक्कादायक! चित्रपटाच्या सेटवर २० फूट उंचीवरून पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
दरम्यान, सुव्रतची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी त्याला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याने लिहिलेल्या या पोस्टमुळे व त्याने व्यक्त केलेल्या आईबद्दलच्या भावनांमुळे अनेकांनी त्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.