Santosh Juvekar On Trolling : ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला अन् प्रेक्षकांनी ही कलाकृती डोक्यावर उचलून धरली. विकी कौशलचं काम पाहून तर सगळेच भारावून गेले. त्याचबरोबरीने चित्रपटातील इतर कलाकारांचीही तितकीच वाहवाह झाली. त्यातीलच एक कलाकार म्हणजे संतोष जुवेकर. त्याने या चित्रपटात रायाजी मालगे ही भूमिका साकारली. संतोषच्या कामाचंही भरभरुन कौतुक झालं. तोही या भूमिकेबाबत तसेच चित्रपटाविषयी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त झाला. पण घडलं काही भलतंच. संतोषने त्याची विकीशी असलेली मैत्री याबाबत भाष्य केलं. अक्षय खन्नाबरोबरचा किस्सा सांगितला. मात्र त्याचं बोलणं ऐकून संतोषला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. याबाबतच त्याने आता भाष्य केलं आहे. (Marathi Actor Santosh Juvekar)
शेलार मामा फाऊंडेशन ‘चिरायु’ हा कार्यक्रम गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संतोषने हजेरी लावली होती. दरम्यान ITSMAJJA शी संतोषने संवाद साधला. यावेळी त्याला ट्रोलिंगबाबत विचारण्यात आलं. संतोषने अगदी शांतपणे दिलेलं उत्तर खरंच कौतुकास्पद आहे. त्याने प्रेक्षकांवर न रागवता सकारात्मक उत्तर दिलं. तसेच प्रेक्षकांना मायबाप म्हणत आपलं मत व्यक्त केलं.
ट्रोलिंगबाबत काय म्हणाला संतोष जुवेकर?
संतोष म्हणाला, “प्रेक्षकांना आम्ही मायबाप प्रेक्षक म्हणतो. मायबाप म्हटल्यानंतर जसे आपले आई-वडील आपल्यावर चिडतात, धपाटे घालतात तसंच आहे. मायबाप बोलतोय तर त्यांनी खूप प्रेम केलं आहे. खुशही झाले आहेत. मायबाप आहेत तर त्यांचा राग पुन्हा कमी होईल. पुन्हा मला पदरात घेतील याची खात्री आहे. कारण मी त्यांचा खूप आवडता लेक आहे. आतापर्यंत माझ्या कामाचं त्यांनीच कौतुक केलं आहे. त्यांच्या मिळालेल्या कौतुकामुळेच आज मी उभा आहे”.
मराठी कलाकारांकडून मिळाणाऱ्या पाठिंब्याबाबत काय म्हणाला?
सोशल मीडयावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे संतोषचे कलाविश्वातील मित्रही हैराण झाले. अवधूत गुप्ते, सुशांत शेलार सारख्या मंडळींनी संतोषची बाजू मांडली. याचबाबत संतोषला विचारलं असता तो म्हणाला, “मी अजिबात त्यांचे आभार मानणार नाही. कारण आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. त्यांचे उपकार मानायचे नसतात. आणि मला त्यांना परकं करायचं नाहीये. त्यामुळे जसं माझ्या पाठीशी कायम उभे आहात तसेच कायम उभे राहा. एवढाच मी तुमच्याकडे हट्ट करेन. देवाकडे मी प्रार्थना करेन की कायम माझ्यापाठी माझ्या जवळची मंडळी उभी असूदेत”. संतोषने ट्रोलिंगकडेही सकारात्मकरित्या पाहण्याचं ठरवलं आहे.