Chhaava Laxman Utekar : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळाली. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी विकी कौशलने विशेष मेहनत घेतलेली पाहायला मिळाली. जवळपास ७-८ महिने तो तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकला. आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. चित्रपटाच्या क्लायमॅक्सवेळी आलेल्या अडथळ्यांबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
‘बॉलिवूड हंगामा’सह नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले की विकी कौशलला चित्रीकरणावेळी दुखापत झाली आणि त्याला बरे होण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला. महाराजांच्या अंतिम काळात औरंगजेबाने संभाजी महाराजांचा खूप छळ केला होता. हे दृश्य शूट करताना विकी कौशलला गंभीर दुखापत झाली. याबद्दल सांगताना लक्ष्मण उतेकर म्हणाले, “संपूर्ण रात्र, विकीचे हात साखळदंडाने बांधलेले होते आणि जेव्हा आम्ही दोरी काढली तेव्हा त्याचे हात खालीच येत नव्हते. त्याचे हात सुन्न पडले होते. यानंतर आम्हाला शूटिंगसाठी दीड महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता”.
आणखी वाचा – वयाच्या ३० व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अभिनयाला रामराम, महाकुंभमध्ये स्वीकारली गुरु दीक्षा
ते पुढे असंही म्हणाले की, “आम्ही क्लायमॅक्सच्या सीनसाठी संपूर्ण सेट बनवलेला तो काढून बरखास्त केला. विकीला बरं होण्यासाठी साधारण दीड महिन्यांचा कालावधी दिला. मग, पुन्हा सेट बांधला आणि नंतर पुन्हा एकदा शूट सुरु झालं. “ज्यावेळी आम्ही नव्याने शूटिंगला सुरुवात केली तेव्हा ऐतिहासिक नोंदीनुसार तो दिवस सारखाच होता. म्हणजेच, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला तो दिवस आणि शूटिंगची तारीख हे दिवस सारखेच होते. योगायोगाने त्याच दिवशी आम्ही चित्रीकरण करत होतो. त्यामुळे त्या दिवशी मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या”.
आणखी वाचा – सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी, अटक करुन नायायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
‘छावा’ चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसला. चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेण्यात आला असल्याने हा वाद निर्माण झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात अभिनेता विक्की कौशल लेझीम खेळताना दिसून आला. हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. काहींनी आक्षेप घेतला, तर यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश होता. मात्र या सीन हटवला असल्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट करताच हा वाद निवळला.