chala hawa yeu dya : ‘चला हवा येऊ द्या’ या शोने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. मात्र १० वर्ष पूर्ण होताच या शोने ब्रेक घेतला. यानंतर आता पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज झाला आहे. यंदाच्या शोमध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे यंदाच्या पर्वातील गँगलीडर्स आहेत. यंदाच्या या नव्या पर्वात महाराष्ट्रातील विविध भागांतून विनोदवीरांची निवड करण्यात आली आहे. आणि हे विनोदवीर गँगलीडर्सच्या टीममध्ये सहभागी होणार आहेत. तर अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ही कलाकार मंडळी धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहेत.
मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या या नव्या पर्वात दोन कलाकारांना प्रेक्षक मिस करताना दिसत आहेत. अभिनेता भाऊ कदम आणि सूत्रसंचालक व दिग्दर्शक निलेश साबळे हे यंदाच्या या शोमध्ये सहभागी नाहीत. काही कारणास्तव त्यांनी या शोमधून एक्झिट घेतली आहे. आता नव्या पर्वात मात्र प्रेक्षक भाऊ कदम आणि निलेश साबळे यांना मिस करताना दिसत आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर नव्या पर्वाचा पहिला एपिसोड आवडला का सवाल केला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भाऊ कदम व निलेश साबळेची कमतरता भासत असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – दिवसा शूट, रात्री कॉर्पोरेट जॉब अन्…; ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन करतो दोन नोकऱ्या, जगतोय असं आयुष्य
या पोस्टवर आलेल्या कमेंटमध्ये एका नेटकाऱ्याने म्हटलं आहे की, “भाऊ कदम पाहिजे होते. मजा नाही”. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, “ना भाऊ कदम, ना सागर कारंडे, ना निलेश साबळे कसलीच मज्जा नाही ठेवली झी वाल्यांनी. ज्या जोकवर हसू येत नाही तिथे जबरदस्ती हसतायत जज लोक. खोटे हसू दिसून येतंय. पांचट झालाय शो. लवकरच चालू झाला तसा बंद होईल वाटत आहे”. याशिवाय “मी जुनेच भाऊ कदमचे एपिसोड बघतो”, “भाऊ कदम शिवाय मज्जा नाही”, अशाही कमेंट केल्या आहेत.
याशिवाय एका नेटकऱ्याने शोला ट्रोल करत, “आम्ही फक्त भाऊ कदमची कॉमेडी पाहू शकतो फालतुगिरी नाही. कृपया निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्यावर अन्याय करुन शो चालू करत आहात तुम्ही हा शो लवकर बंद करावा ही विनंती कारण हा एपिसोड खूपच फालतू आहे”, असं म्हटलं आहे. तर काहींनी भाऊ व निलेशच्या आठवणीत “भाऊ कदम आणि निलेश साबळे नाहीत कार्यक्रमाला मज्जा नाही”, “भाऊ कदम, निलेश साबळे लिजेंड आहेत”, अशा कमेंट केल्या आहेत.





