Kushal Badrike video : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आजवर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. दहा वर्ष सुरळीत सुरु असणाऱ्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर हा शो पुन्हा एकदा एका नव्या ढंगात रसिकांच्या भेटीस आला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. कोणताही वारसा नसताना ही मंडळी सिनेविश्वात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहेत. यापैकी एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने आजवर त्याच्या विनोदी शैलीने रसिकांच्या मनात घर केलं. अभिनयाबरोबरच कुशल सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात रहात असतो.
अनेकदा कुशल त्याच्या पत्नी-मुलाचे व्हिडीओ शेअर करतो. वैयक्तिक आयुष्याबाबत तो नेहमीच पोस्ट करत असतो. अशातच अभिनेत्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. कुशलचा हा व्हिडीओ त्याच्या मित्रांबरोबरचा आहे. कुशल आणि त्याच्या मित्रांचे अनेक फोटो, व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. कुशलची मित्रांबरोबरची मैत्री नेहमीच बोल्ड असलेली पाहायला मिळते.
अशातच त्याच्या मित्रांबरोबरचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल विजू माने यांच्यासह बाहेर जेवणासाठी गेल्याचं दिसत आहे. आणि तिथेच एक महिला नृत्य सादर करताना दिसत आहे. त्याचवेळी खायला शेवपुरी पुढ्यात आलेली आहे. पण कुशल त्या महिलेचा नृत्य पाहण्यात व्यस्त असल्याने त्याला शेवपुरी खाण्याचं भान राहिलेलं नाही. विजू माने त्याला याची आठवण करुन देत आहेत आणि त्यांनीच कुशलचा हा व्हिडीओ शूट केला आहे. कुशलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.
या व्हिडीओखालील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही कमेंट आहे कुशलची पत्नी सुनयनाची. सुनयना म्हणाली, “नृत्याची फारच आवड दिसतेय. शेवपुरी खाऊन झाली की घरी या. मी नृत्य शिकवते”. तिच्या या कमेंटवर अनेकांनी त्याला चांगले नृत्य शिकव, शेवपुरी महागात पडणार अशा अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर विजू माने यांनी कुशल बद्रिकेच्या व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्याच्या पत्नीला टॅग केले आणि लिहिले की, “बघ आणि बघून घे”. त्यावर सुनयनाने लिहिले की, “म्हणजे माझा काय तसा आक्षेप नाही. पण, मी बघितलही नाही तिथे मी बघूच शकत नाही”. कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे.





