मराठी सिनेसृष्टीतील ‘झी चित्र गौरव’ या पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘झी चित्र गौरव’ सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. कलाकारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा अगदी दिमाखात संपन्न झाला. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवरुन या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला खास पाहुणी म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आमंत्रित करण्यात आलं होतं. शिल्पाने या सोहळयाला अगदी मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावली होती. (Shilpa Shetty Maharashtrian Look)
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. यावेळी अनेक कलाकार मंडळींची हजेरी पाहायला मिळाली. दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लूकवरुन नजर हटत नाही आहे. अनेकदा वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणाऱ्या शिल्पाने यावेळी पुरस्कार सोहळ्यासाठी केलेला पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला. स्टायलिश व सर्वात फिट अशी अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात शिल्पाने पिस्ता रंगाची पैठणी साडी परिधान केली होती. तर गळ्यात मोत्याचा हार, नाकात नथ असा मराठमोळा अंदाज साऱ्यांच्या पसंतीस पडला. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या मराठमोळ्या लूकचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये शिल्पा अतिशय सुंदर दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. या लूकसाठी शिल्पाने केस मोकळे सोडले असून वेव्ही हेअरस्टाईल केली. पारंपरिक पठणीवर तिचे हे वेव्ही केस अधिक सुंदर व आकर्षक दिसत होते. तर शिल्पाच्या चेहऱ्यावरून नजरही हटत नव्हती.
शिल्पाने केवळ मराठमोळा लूकच नव्हे तर पापाराझींशी मराठी भाषेत संवाद देखील साधला. अभिनेत्रीला अनेकांनी “पैठणी खूप सुंदर आहे”, “नाकातील नथ छान वाटतेय” अशा प्रतिक्रिया दिल्या. यावर शिल्पाने सर्वांना मराठीत उत्तरं देत “बघा साडी पण सुंदर आहे ना?”, असं म्हणत तिची साडी फ्लॉन्ट केली. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात शिल्पाचा लूक भाव खाऊन गेला.