Akshay Kelkar Mehandi Ceremony : सध्या मराठी सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. अशातच सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असून आता त्याच्या मेहंदी समारंभाला सुरुवात झाली आहे. हा अभिनेता म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता अक्षय केळकर. अक्षय लवकरच लग्नबंधनात अडकणार असून आता त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर थेट पोस्ट करत त्याने मेहंदीला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच अक्षयने सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या बायकोसह फोटो शेअर करत लग्न करत असल्याचं सांगितलं. आणि आता त्याच्या मेहंदीचे फोटोही समोर आले. “मेहंदी in process…”, असं कॅप्शन देत अक्षयने या समारंभाला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं. यावेळी अक्षय आणि त्याची पत्नी साधना हिचा मेहंदी स्पेशल खास लूक पाहायला मिळाला. गडद निळ्या रंगाचा मॅचिंग ड्रेस त्यांनी परिधान करत लूक पूर्ण केला. त्यांची ही मेहंदी स्पेशल पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकजण दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
अक्षयने काही दिवसांपूर्वीच लगीनघाई सुरु केल्याचे त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन समोर आले. अक्षयने काही दिवसांपूर्वीच त्याच्या बायकोसह लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच अक्षय लग्नपत्रिका घेऊन त्याच्या आईसह त्याच्या गावी दापोलीला कुलदेवतेच्या दर्शनाला गेले होते. देवासमोर पहिली लग्नपत्रिका ठेवून आशीर्वाद घेतल्यानंतर त्याने नातेवाईकांना आमंत्रण देण्यास सुरुवात केली. अक्षय व त्याची होणारी पत्नी साधना यांच्या लग्नाची कुटुंबियही जोरदार तयारी करत आहेत.
गेली दहा वर्ष अक्षय व साधना हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अक्षय व साधनाने आपलं नातं पुढे नेण्याचं ठरवलं. कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याआधीही अक्षय बऱ्याचदा त्याच्या गर्लफ्रेंडबाबत बोलताना दिसला होता. अखेर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली. आता अक्षयचं लग्न नक्की कधी?, कुठे असणार? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता रंगली आहे.