Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या घरातून पहिलाच बाहेर पडलेला स्पर्धक म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुरुषोत्तमदादा त्यांचा एक वेगळाच रंग घेऊन आले होते. पण आपला खेळ दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्यांचा प्रवास संपला. पुरुषोत्तम दादा पाटील यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाताना अनेक घोषणा दिल्या. सुरुवातीला संतांचा जयजयकार आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. त्यांच्यापाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली. मात्र अरबाज पटेल शांत उभा होता. यावरुनच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
पुरुषोत्तम दादा पाटील आणि घरातील इतर सर्व स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत होते. पण त्यावेळी अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता. आता ‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या एलिमिनेशमधून अरबाज पटेल घराबाहेर पडला आहे. अरबाज घराबाहेर पडताच त्याने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य करताना या मुद्द्यावर त्याने आपलं मत मांडलं आहे. मूळचा छत्रपती संभाजी नगरचा असणाऱ्या अरबाजकडून झालेल्या या चुकीवर त्याने आपलं मत मांडलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझं कोणी नाही पण मी आहे”, सूरजने निक्कीची काढली समजूत, म्हणाला, “एकटंच खेळायचं आणि…”
या घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना अरबाज म्हणाला, “मला काय झालं होतं ते खरंच मला माहित नाही. खरं सांगायचं तर मी छत्रपती संभाजी नगरचा आहे. आणि त्याबद्दल मला किती आदर आहे हे मलाच माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काम केलं आहे आणि आपण त्यांच्याबरोबर होतो, त्यांच्याबरोबर काम केलं आहे. त्यांनी छत्रपती संभाजी नगरला सांभाळलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर खूप आहे. जेव्हा महाराजांचा जयजयकार झाला तेव्हा मला नाही माहित तिकडे असं काय झालं. मी गेममध्ये होतो तेव्हा त्यांना(पुरुषोत्तम दादा पाटील) नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरु असेल या विचारात मी काहीसा होतो. तुम्ही पाहाल तर आतापर्यंत जेवढे लोक घराबाहेर आले आहेत त्या सगळ्यांसाठी मी रडलो आहे. फक्त मी बाहेर आलो तेव्हा रडलो नाही पण निक्की रडत होती ते पाहून तिच्यासाठी मला रडू आलं”.
आणखी वाचा – अभिमानास्पद! ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ‘लापता लेडीज’ची निवड, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
पुढे तो म्हणाला, “कोणत्याही देवाबद्दल व पुरुषांबद्दल माझ्या मनात असं काहीच नाही आहे. आणि मी छत्रपती संभाजीनगरचा आहे तर त्यांच्याबद्दल किती आदर आहे हे वेगळं सांगायला नको. त्यांच्यामुळेचं आपण आहोत. पण बरेचदा डोक्यात काहीतरी वेगळं सुरु असतं, विचारात असता तेव्हा इकडे काय सुरु आहे हे आपल्याला माहित नसतं. नंतर जेव्हा मला कळलं की मी असं केलं तेव्हा माझं असं झालं की मी असं नाही केलं. एकतर मी ऐकलं नसेल वा दुसऱ्या कोणत्या तरी विचारात असेल म्हणून ते घडलं असावं”.