dhananjay powar video : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेच्या वादाने जोर धरला आहे. या वादाने आता राजकीय वातावरणातही चांगलीच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर तर अमराठी माणसांबरोबरचे वाद सतत पाहायला मिळत आहेत. काहींना हा वाद पटला आहे तर काहींना हा वाद पटलेला नाही. दरम्यान, हा वाद आता चिघळत असताना मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा पापाराझींबरोबरचा एक संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओमधील संवादात मराठी, हिंदी भाषेचा उल्लेख आहे. या व्हिडीओवर रील स्टार पुनीतने रितेश देशमुखला टोकलं आहे. आणि याचा एक व्हिडीओ बनवून त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये पुनीत रितेशबद्दल असं म्हणतो की, “तू मराठी भाषेला पाठिंबा देत आहेस हे ठीक आहे, आम्हीसुद्धा मराठी भाषेला पाठिंबा देत आहोत. पण, कोणी तुझ्याबरोबर हिंदीमध्ये बोलत आहे; तर त्याचा अपमान करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आणि तुला तरी कुठे मराठी येतं? तू स्वतःसुद्धा इंग्रजी शाळेत शिकला आहेस आणि तू ख्रिश्चन मुलीबरोबर लग्न केलं आहेस”. पुनीतच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यावर आता ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार उर्फ डीपीने प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा – ‘ठरलं तर…’मध्ये अर्जुनचा हटके लूक, कथेत येणार मोठा ट्विस्ट, पुराव्यासाठीची मेहनत आणि…

या व्हिडीओत तो असं म्हणतोय, “या पुनीत सुपरस्टारला अक्कल असली पाहिजे, ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे का? घरच्यांबरोबर आणि आपल्या मुलांबरोबर ते ज्याप्रकारे वागतात, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक संस्कारी व्यक्ती म्हणून आम्ही पाहतो. आम्ही त्यांना आदर्श मानतो. शिवाय महाराष्ट्रातीलही बरेचजण त्यांना आदर्श मानतात”.
आणखी वाचा – Video : मुळशीमधील गावात शेतीत रमले प्रवीण तरडे, शेत बांधावर लावलं सफरचंदाचं झाड, व्हिडीओ व्हायरल
यानंतर धनंजय असं म्हणतो, “पुनीत तू त्यांना (रितेश देशमुख) कोणत्या थराला जाऊन बोलत आहेस. तुझी लायकी नसताना तू बोलू नकोस. लायकी हा शब्द वापरणं चूक आहे; पण तूझे जे व्हिडीओ बनवतोस, त्यातून तुझे विचार कळतात. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट नको बोलूस”.





