९ जून रोजी एकीकडे नव्या सरकारची स्थापना होत असताना दुसरीकडे वैष्णोदेवीच्या भक्तांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सगळेच हादरले. शिवखोडीहून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, काही दिवसांपासून “All Eyes On Rafah”च्या संदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत होती आणि याच पोस्टशी संबंधित ‘All Eyes On Vaishnodevi Attcak’ व ‘All Eyes On Reasi’ अशा पोस्ट सध्या व्हायरल होतं आहेत.
जम्मूच्या रियासी येथील शिवखोडी येथून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर आता सोशल मीडियावर ‘ऑल आइज ऑन रियासी’ ही पोस्ट ट्रेंड करू लागली आहे. अनेक नेटकरी व मराठीतील अनेक कलाकार मंडळी पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. परंतू, यावर कोणत्याच बॉलिवूड कलाकारांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही आणि याचबद्दल ‘बिग बॉस मराठी’ विजेती मेघा धाडेनेही तिचा राग व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – राजयोगामुळे मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे अगदीच खास, काय असणार तुमच्या नशिबात?, जाणून घ्या…
मेघा धाडेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून तिने बॉलिवूड कलाकारांवर राग व्यक्त केला आहे. बॉलिवूड कलाकार रफाहवर हल्ला झाल्यावर व्यक्त होतात, मात्र देशात दहशतवादी हल्ला झाला तर डोळ्यांवर पट्टी बांधतात अशा आशयाची ही पोस्ट आहे आणि हीच पोस्ट मेघाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे. या पोस्टमध्ये माधुरी दीक्षित, वरुन धवण व आयुष्मान खुराणा यांचे फोटो पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील भाविकांना घेऊन ही बस शिवखोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती. याचवेळी पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केला. गोळीबारानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५३ आसनी ही बस खोल दरीत कोसळली.
,