‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाचा पहिलाच शनिवार चांगलाच गाजेल असे चित्र आहे. पूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘चावडी’वर स्पर्धकांची शाळा घ्यायचे, आता रितेश ‘धक्क्या’वर सर्वांना धक्के देणार आहे. आधीच्या ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन्समध्ये असणाऱ्या ‘बिग बॉस चावडी’ची जागा यंदा ‘रितेश भाऊच्या धक्क्या’ने घेतली आहे आणि या पहिल्याच धक्क्यावर निक्की तांबोळीची शाळा घेतली जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही’ असं रितेशने तिला सुनावलं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा ‘भाऊ’ म्हणून लोकप्रिय असलेला रितेश पहिल्यांदाच अशाप्रकारे कुणावर तरी चिडलेला पाहायला मिळाले.
रितेशच्या या ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने व डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर तिचा माज उतरवणार असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.
या प्रोमोद्वारे अनेक कलाकार व प्रेक्षकांनी रितेशचे कौतुक केलं आहे. अनेकांना रितेशचा हा दरारा चांगलाच आवडला आहे, अनेकांनी त्यांच्या या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे व्यक्त केल्या आहेत. “एक नंबर, हेच बघायला होतं पूरण महाराष्ट्राला”, “आता सगळ्यांचा माज उतरणार”, “मराठी लोकाचा छावा फक्त आणि फक्त रितेश सर”, “प्रेक्षक याचीच सात दिवस झाले वाट बघत आहेत”, “एक नंबर”, शेवटी प्रश्न मराठी अस्मितेचा आहे”, “वाह रितेश भाऊ वाह… हेच अपेक्षित होत”, “हिंदी चित्रपटात काम करूनदेखील रितेश सरांना मराठीचा अभिमान आहे” अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, गेले काही दिवस निक्की व वर्षा यांचे भांडण चांगलेच चर्चेत आहे. या भांडणामुळे निक्कीला अनेक कलाकार व नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे सुनावले. मात्र रितेश यावर काय भूमिका घेणार? याची सर्वजण वाट पाहत होते. रितेश देशमुख यांचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. रितेशचा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून त्याची एक वेगळीच स्टाइल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या भागासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.