Bigg Boss Marathi 5 New Promo : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ मधील स्पर्धकांचा प्रवास पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या रिऍलिटी शोने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. अल्पावधीतच या शोने प्रेक्षकांची मन जिंकली. यंदाच्या या नव्या पर्वात सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता रितेश देशमुख साकारताना दिसत आहे. तर यंदाचे हे नवं पर्व केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर, कीर्तनकार, गायक, रील स्टार अशा विविध क्षेत्रातील मंडळी ही गाजवताना दिसत आहेत. यंदाच्या या नव्या पर्वात प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकाराला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
‘बिग बॉस मराठी’ सीजन जेव्हापासून सुरु झालं तेव्हापासून एका स्पर्धकाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. तो स्पर्धक म्हणजेच गुलीगत फेम सूरज चव्हाण. पहिल्याच आठवड्यात सूरजचा खेळ पाहून प्रेक्षकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनीच कशाला तर घरातील स्पर्धकांनीही त्याला इथे का आणलं आहे, असा सवाल केला. या शोमध्ये येऊन तो काय करणार?, तो चुकीच्या शोमध्ये आला आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. मात्र सूरजला ‘बिग बॉस’ने पाठिंबा दर्शवल्यानंतर सूरजमध्ये झालेला बदल पाहून त्याला आता सबंध महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सूरजला न धड बोलता येत, न वाचता येत अशावेळी त्याला स्पर्धकांसह वावरणं फारच कठीण जात होतं. असं असलं तरी प्रत्येक माणसाला समजून घेत प्रत्येकाचं म्हणणं समजून घेत आता सूरज खेळ खेळू लागला आहे.
इतकंच नव्हे तर न पेटलेल्या मुद्द्यांवरही सूरज भाष्य करताना दिसत आहे. यामुळे त्याचं स्पर्धकांशी भांडणही झालेला पाहायला मिळालं. मात्र त्याच्याबरोबरचे स्पर्धक त्याला समजून घेत त्याच्याशी खेळ खेळताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील एक नवा प्रोमो समोर आला आहे. कॅप्टन अंकिता वालावलकरने स्पर्धकांना दिलेल्या ड्युटी नुसार सूरजच्या वाटेला बाहेरच्या आवारातील केर काढण्याचं काम येतं. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,”सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं”. त्यावर पॅडी म्हणतो,”बिचारा बाहेरदे खील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता”. त्यावर अंकिता म्हणते,”सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली”.
आणखी वाचा – “खरा वागलो तरी एकटाच पडलो आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, “ज्यांनी खरे रंग दाखवले…”
एकूणच सूरजचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास खूप रंजक आहे. एखाद्या छोट्याशा खेडेगावातून रील व्हिडीओ बनवणाऱ्या सूरजने तमाम महाराष्ट्राला वेड केलं आणि आता ‘बिग बॉस’च्या घरातून तो साऱ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. सोशल मीडियावर ही सूरजला बहुसंख्येने पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे.