‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सातव्या आठवड्यात संग्राम चौगुलेनं वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या खेळाला चांगलीच रंगत आली. अशातच पहिले दोन आठवडे शांत असलेले पॅडी कांबळे आता त्यांचा खेळ दाखवत असून प्रत्येक खेळामध्ये त्यांनी बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पॅडी यांनी अरबाज व वैभव यांना सळो की पळो केलं. पॅडी कांबळेंच्या या खेळाचं मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरी पोस्ट शेअर करत कौतुक केलं. (Riteish Deshmukh Praised Pandharinath Kamble)
‘बिग बॉस’च्या घरात सातव्या आठवड्यातील पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या खेळामध्ये पॅडी यांनी चपळता दाखवत अरबाज आणि वैभव यांची भंबेरी उडवून लावली. त्यांचा हा खेळ पाहून मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव व विशाखा सुभेदार यांनी खास पोस्ट शेअर केली होती. अशातच आता रितेश देशमुखनेदेखील पॅडी कांबळे यांचं कौतुक केलं आहे.
यावेळी रितेश पॅडी यांना असं म्हणाला की, “पॅडी भाऊ, तुम्ही हा टास्क काय खेळलात. तुमची चपळाई पाहण्यासारखी होती. तुम्ही ससा नाही झालात पण सस्यासाखे धावलात. लहानपणी कबड्डी, खोखो खेळलेले दिसताय”. यावर पॅडी असं म्हणतात की, “खेळ फार खेळलो नाही पण लहानपणापासून अंगात चपळता होती आणि आता तुम्हीही कौतुक करत आहात म्हणजे ती अजूनही असेल असं मला वाटतं”.
यावर रितेश असं म्हणतो की, “तुमची चपळाई आम्हाला आणि प्रेक्षकांना दिसत आहे. अरबाजने पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही अंगाला तेल लावूनच आला होतात. माझ्यामते हा आठवडा कुणी गाजवला असेल तर तो पॅडी भाऊ तुम्ही…” दरम्यान, पॅडी यांच्या खेळीचे विशाखा यांनीही कौतुक केलं होतं. “वय वर्षे ५२ असावं तूझ अंदाजे.. पण बाबो.. कसलं पळवलं आहेस त्यांना. मज्जा आली.. बहारदार खेळला आहेस तू..” अशी पोस्ट शेअर करत विशाखा यांनी पॅडी यांचे कौतुक केले.
तसंच अभिनेता सिद्धार्थ जाधवने “Well Played भावा… काही लोकांना ओव्हर अॅक्टिंग वाटत होती, त्यांना तुझा Over Active पणा नक्कीच दिसला असेल… कसलं पळवलंस दोघांना… यालाच म्हणतात ‘अनुभव!” अशी पोस्ट करत पॅडी कांबळे यांचे कौतुक केलं होतं. त्यानंतर आता बिग बॉसचा होस्ट रितेशनेदेखील पॅडी यांच्यावर स्तुतीसुमन उधळले आहेत.