‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय हिंदी मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राने विनोदाची उंची वाढवत मालिकेचं स्थान उंचावलं. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेलं पात्र म्हणजे अंगुरी भाभी. मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शुभांगी अत्रे तिचा पती पियुष पुरेसह वेगळी होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आतापर्यंत या अभिनेत्रीने आपल्या मुलीला या सगळ्यापासून दूर ठेवले असून वेगळे होण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारलेला नाही. समोर आलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने अद्याप घटस्फोट दाखल केलेला नाही. (Shubhandi Atre Divorce News)
शुभांगी अत्रे यांनी २००३ मध्ये इंदूरमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या पियुषसह लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी तिने एका मुलीला जन्म दिला. पण गेल्या वर्षी हे दोघे जवळपास वर्षभर एकत्र राहत नसल्याची बातमी आली होती. दरम्यान त्यांच्यातील वादामुळे दोघांनाही वेगळे व्हायचे आहे असं समोर आलं. या जोडप्याने त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी दिल्याचंही सांगण्यात आलं. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दोघेही यापुढे एकत्र राहू शकणार नाहीत असा त्यांच्यात करार झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री वेगळी राहत आहे परंतु घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप त्यांनी केलेली नाही. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, शुभांगी व पियुष वेगळे झाले आहेत. आणि आपापल्या आयुष्यात पुढेही गेले आहेत. पण जेव्हा कायदेशीर औपचारिकता येते तेव्हा ते मागे हटतात. कारण दोघांनाही आपल्या मुलीला या सगळ्या संकटात आणायचे नाही. त्यामुळे जे सुरु आहे ते तसेच सुरु ठेवायचं आहे.
शुभांगी अत्रेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘कसौटी जिंदगी की’, ‘कस्तुरी’, ‘चिडिया घर’ यांसारख्या मालिकेत काम केलं आहे. त्यानंतर अभिनेत्रीने ‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारत सर्वांचे मनोरंजन केलं. अभिनेत्री फारशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत नाही. याउलट ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असते.