Yogita Chavan On Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वतातून अभिनेत्री योगिता चव्हाणची एक्झिट झालेली पाहायला मिळाली. शांत, संयमी आणि टास्क दरम्यान योग्य तो इंगा दाखवणाऱ्या योगिताच्या एक्झिटनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात योगिताचा खेळ पाहणं रंजक ठरत होतं. संस्कृती जपत योगिता उत्तम खेळ खेळत होती. योगिताचा ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ प्रेक्षकांना आवडत असतानाच योगिताला एक्झिट घ्यावी लागली. घरातून बाहेर पडताच योगिताने माध्यमांना मुलाखती दिल्या यावेळी तिने घरातील प्रवासाबाबत बरंच भाष्य केलं.
टास्क दरम्यान योगिता उत्तम खेळ खेळलेली दिसली. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की, जान्हवी यांनी योगिताला खाली पाडलं आणि तिला खेचलं. हे योगिताला सहन झालं नाही शेवटी योगिताने तिचा इंगा दाखवत निक्की व जान्हवी यांच्यावर पलटवार केला. योगिता निक्की व जान्हवीला पुरुन उरलेली दिसली. दरम्यान, योगिताची एक्झिट झल्यानंतर प्रेक्षकांनी, तिच्या चाहते मंडळींनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर हा भाग योगिताने पुन्हा पाहिला. याबाबत तिने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – Video : वाढदिवसाला क्रांती रेडकरला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, मंदिरातही गेले अन्…; व्हिडीओही केला शेअर
योगिता यावेळी असं म्हणाली की, “मी बाहेर आल्यावर तो एपिसोड पाहिला. त्यामध्ये वैभव बोलत होता की, कपडे फाटले तरी चालतील पण ओढ. त्यावर अंकिता त्याला ओरडल्यावर तो तिला म्हणाला की, ती एकटी थोडी खेळतेय. मी तर पलिकडे सांगतोय. यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच मला कळलं नाही. मी ते जॅकेट काढलं नाही कारण आतमध्ये माझा ड्रेस होता. जरी मी माझं जॅकेट काढलं असतं तर निक्कीने माझे कपडे ओढायलाही मागे पुढे पाहिलं नसतं. कारण ती मुलगी तशी आहे. तो टास्क जिंकण्यासाठी खूप खालच्या पातळीवर जातात लोक आणि मला ते करायचंही नव्हतं. माझं जॅकेट ओढून गळा आवळला होता तिने. पण त्यावेळी जितकं मला खेळता आलं तितकं मी केलं”.
पुढे योगिता टीम ए बद्दल बोलताना असं म्हणाली की, “मला त्या दुसऱ्या टीममधील कुणीच आवडत नाही. कारण त्या टीममध्ये कुणीही एकट्याने आणि स्वत:साठी खेळत नाही. तिथे निक्की मनाने सगळी सूत्र हलवते. तिचा एक हुकुमशाहीपणा तिथे आहे आणि बाकी सगळे तिच्या हाताखाली कामं करतात. ती तिचा खेळ बरोबर खेळते पण हे इतरांनाही कळायला हवं”.