आपल्या लोकगीतं आणि भक्तीगीतांमुळे लोकगायक प्रल्हाद शिंदे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. आजही प्रत्येक घरात त्यांच्या गाण्यांची कॅसेट वाजत असते. नुकतीच पंढरपूरची वारी सुरु झाली असून अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत आहेत. या वारीच्या निमित्ताने व पांडुरंगाच्या निमित्ताने गायक प्रल्हाद शिंदे त्यांची अनेक विठ्ठल भक्तीगीतांनी आपल्यात आहेत ही जावीन कायमच भासते. त्यांच्या गाण्यांचा हाच वारसा त्यांच्यानंतर शिंदे घराण्याने कायम पुढे चालवला आहे. प्रल्हाद शिंदेंनंतर आनंद शिंदे व त्यांची मुलं आदर्श व उत्कर्ष शिंदे त्यांचा वारसा जपत आहेत.
प्रल्हाद शिंदे हे नाव विठ्ठल भक्तीगीतांमुळे खूपच लोकप्रिय आहे. आजही त्यांची अनेक भक्तीगीतं रसिक आवडीने ऐकतात आणि त्यांचा नातू आदर्श शिंदेदेखील आपल्या आजोबांच्या आठवणीत अनेकदा त्यांची गाणी गात असतो. अशातच त्याने नुकतीच आजोबांच्या आठवणीत पंढरपूरच्या पांडुरंगाला साद घातली. आपल्या आजोबांच्या आठवणीत गायक आदर्श शिंदेने सर्वांचे आवडते व लोकप्रिय गाण्याचे गायन केले आणि हे गाणं म्हणजे ‘पाऊले चलती पंढरीची वाट’.
‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’च्या दोन्ही पर्वांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. नुकताच या शोनिमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिरात महाआरतीचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आदर्शने त्याच्या आजोबांचे विठ्ठल गीत गायले. यावेळी आदर्शच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी सर्वांचेच कान तृप्त झाले. त्याच्या गाण्याचा खास सादरीकरणानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याला दादही दिली.
दरम्यान, पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही परीक्षकांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईचा लाडका गायक आदर्श शिंदे हे आहेत. पहिला एपिसोड आषाढी एकादशी विशेष भाग असल्यामुळे विठुनामाचा जयघोष करत कार्यक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे.